डर्टी ग्रिटिंग्जचा धसका
By Admin | Updated: October 23, 2014 02:20 IST2014-10-23T02:20:49+5:302014-10-23T02:20:49+5:30
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राइट टू पी ने पाठविलेल्या डर्टी ग्रिटिंग्जचा महापालिका अधिका-यांवर परिणाम झाल्याचे दिसून आले.

डर्टी ग्रिटिंग्जचा धसका
मुंबई : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राइट टू पी ने पाठविलेल्या डर्टी ग्रिटिंग्जचा महापालिका अधिका-यांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. मुंबईतील स्वच्छतागृह आणि मुताऱ्यांची सद्यस्थिती दर्शवणारे ग्रिटिंग मिळताच क्षणी, महापालिकेने आरटीपी कार्यकर्त्यांना ५ नोव्हेंबर रोजी बैठकीसाठी बोलावले आहे.
आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीेत महापालिका अधिकारी आणि आरटीपी कार्यकर्त्यांनी मुंबईतील विभागनिहाय स्वच्छतागृह आणि मुताऱ्यांची माहिती घेतली होती. या बैठकीमध्ये कोणत्या ठिकाणी योग्य सोय नाही, काय उपाययोजना करायला हव्यात या विषयांचा आढावा घेण्यात आला होता. या बैठका पूर्ण होईपर्यंत महापालिका अधिकारी आरटीपी कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. मात्र, यानंतर कार्यकर्त्यांनी संपर्क केल्यास त्यांच्या कडून कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळत नव्हते. झालेल्या बैठकांचा आढावा जेव्हा पालिका अधिकाऱ्यांनी आयुक्तांसमोर सादर केला, तेव्हाही आरटीपी कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलेले नव्हते. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. म्हणूनच दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी ‘डर्टी ग्रिटिंग्ज’ची शक्कल लढवली.
बुधवार सकाळपासूनच आरटीपी कार्यकर्त्यांनी ईमेलच्या माध्यमातून महापालिका आयुक्त, अधिकारी, आमदार, इतर संबंधित व्यक्तींना ग्रिटिंग्ज पाठवली होती. या ग्रिटिंग कार्डवर दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र येथे दिव्यांचे, रोषणाईचे, कंदीलाचे फोटो न वापरता, मुंबईतील अस्वच्छत स्वच्छतागृह आणि महिला मुताऱ्यांचे फोटो लावण्यात आले
होते.
या आधीही महापौर, पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांना व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून महिला मुताऱ्यांची स्थिती दाखवण्यात आली होती. तरीही प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन होताना दिसत नव्हते. मग शुभेच्छा पत्रांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्यामुळे सप्टेंबरनंतर आता ५ नोव्हेंबरमध्ये आम्हाला बैठकीची वेळ मिळाली असल्याचे आरटीपी कार्यकर्त्या मुमताज शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)