शेतमाल थेट ग्राहकांच्या दारी

By Admin | Updated: January 28, 2015 23:00 IST2015-01-28T23:00:21+5:302015-01-28T23:00:21+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि शेतीमालाची विक्री करण्याकरिता राजिपने पनवेलकडे बाजारपेठ म्हणून लक्ष देण्यास सुरुवात केली आहे

Direct customer's wages | शेतमाल थेट ग्राहकांच्या दारी

शेतमाल थेट ग्राहकांच्या दारी

कळंबोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि शेतीमालाची विक्री करण्याकरिता राजिपने पनवेलकडे बाजारपेठ म्हणून लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: सिडको वसाहतीकडे कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले असल्याचे पनवेल येथे पार पडलेल्या कृषी प्रदर्शन आणि मेळाव्यातून स्पष्ट झाले आहे. वसाहतीत मोठ्या प्रमाणात ग्राहक असून त्यांच्यापर्यंत थेट माल पोहचिवण्याच्या दृष्टीने संकल्प करण्यात आल्याची माहिती राजिपचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी दिली.
रायगड जिल्हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा. यात पनवेल आणि उरणमध्ये लागवडीखालील क्षेत्र बऱ्यापैकी होते. मुंबईच्या जवळ असलेल्या या परिसरातील पिकती जमीन सिडकोने संपादित केली आणि या ठिकाणी नागरी वसाहती विकसित केल्या. त्यामुळे शेती व्यवसाय कमी झाला. त्या जागेवर औद्योगिकीकरण आणि नागरीकरण वाढले. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पनवेल, कर्जत, खालापूर या भागात नयना प्रकल्प आला आहे. त्यामुळे याठिकाणी नियोजनबध्द विकास होणार हे निश्चित. खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, द्रोणागिरी, उलवे, तळोजा, नावडे, करंजाडे यासारख्या सिडको वसाहती विकसित झाल्या असून या वसाहतीत मोठ्या बाजारपेठा निर्माण झाल्या आहेत.
एपीएमसीमधून ठोक दराने भाजीपाला खरेदी करून तो विक्रेते पदपथावर बसून चढ्या भावाने विक्री करतात. अर्थात ही भाजी घाटमाथ्यावरून एपीएमसी मार्केटमध्ये आणि तेथून सिडको वसाहतीत येते त्यामध्ये मोठा कालावधी खर्च होतो. त्यामुळे ग्राहकांना ताजी भाजी मिळत नाही. याच गोष्टीचा विचार करून रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेती माल सिडको वसाहतीत विक्रीकरिता आणण्याचा मानस जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वी नावडे येथे कृषी प्रदर्शन आणि मेळावा आयोजित केला होता. प्रदर्शनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्रित करून पनवेल परिसरातील बाजारपेठेची माहिती करून दिली. त्याचबरोबर रायगडातील शेतकऱ्यांनी जैविक शेती करावी याकरिता विशेष जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर उत्पादन क्षमता वाढविण्यावरही भर दिला गेला.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या २१०० शेतकऱ्यांना बियाणे खरेदीकरिता जिल्हा परिषदेने मदत दिली. त्याचबरोबर विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिसरातील शेतीमालाला बाजारपेठ, योग्य बाजारभाव मिळावा यासाठी कृषी समिती प्रयत्नशील आहे. त्यानुसार सिडको वसाहतीकडे चांगली बाजारपेठ म्हणून लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Direct customer's wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.