वाहने न्या थेट मांडव्याला
By Admin | Updated: November 17, 2015 02:30 IST2015-11-17T02:30:12+5:302015-11-17T02:30:12+5:30
भाऊच्या धक्क्यापासून थेट मांडवा, नेरूळपर्यंत जेटीद्वारे चारचाकी वाहने नेण्याची सोय लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोव्याला जाण्यासाठी मांडवापर्यंतच्या

वाहने न्या थेट मांडव्याला
मुंबई : भाऊच्या धक्क्यापासून थेट मांडवा, नेरूळपर्यंत जेटीद्वारे चारचाकी वाहने नेण्याची सोय लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोव्याला जाण्यासाठी मांडवापर्यंतच्या वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागणार नाही.
भाऊच्या धक्क्यापासून मांडवाला जेटीने मोटार न्यायची आणि तिथून पुढे गोव्यापर्यंतचा प्रवास त्याच मोटारीने करता येईल. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीच्या २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्याच्या जेटी मजबूत करणे, मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन हायवे आणि मुंबई-ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाच्या मंजुरीबाबतचे विषय समितीसमोर येतील, असे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांनी निवडक पत्रकारांना सांगितले की, समितीच्या बैठकीचा अजेंडा अंतिम झालेला नाही. वरील तीन विषय चर्चेसाठी येतील. मुख्यमंत्री रात्री मुंबईत परतत असून, त्यांच्याशी चर्चेनंतर अजेंडा निश्चित केला जाईल.
मुंबई-नागपूर सुपरकम्युनिकेशन हायवेला राज्य मंत्रिमंडळाने
मंजुरी दिली आहे. अंतिम स्वरूप समितीच्या बैठकीत निश्चित केले जाईल. (विशेष प्रतिनिधी)
- भाऊचा धक्का, मांडवा आणि नेरूळदरम्यान भाऊचा धक्का हा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या, मांडवा हे मेरीटाइम बोर्डच्या तर नेरूळ हे सिडकोच्या अंतर्गत येते. या तिन्ही संस्था दुचाकी आणि मोटारगाड्यांची वाहतूक करू शकतील, अशा जेटी विकसित करतील.