Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयात सचिव असल्याचे सांगून थेट नियुक्तीचे पत्र, दादरमध्ये तिघांची १६ लाख रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल

By मनीषा म्हात्रे | Updated: April 17, 2023 09:27 IST

Crime News: मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीचे सत्र सुरूच असून, मंत्रालयात सचिव असल्याचे सांगून लिपिक, तसेच चालकपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणीसह तीन जणांची १६ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

- मनीषा म्हात्रे मुंबई : मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीचे सत्र सुरूच असून, मंत्रालयात सचिव असल्याचे सांगून लिपिक, तसेच चालकपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणीसह तीन जणांची १६ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने विश्वास संपादन करण्यासाठी थेट बनावट नियुक्तीच्या पत्रासह त्यांना व्हिजिटिंग कार्डही दिले आहेत. श्याम विठोबा खतकर आणि विशाल नारायण गोनभरे अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याविरुद्ध दादर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

दादर परिसरात राहणारी सुप्रिया खापरे (३०) एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार,  दादर परिसरात राहणारा विशाल हा तिचा मावस भाऊ आहे. त्याने गेल्या वर्षी मे महिन्यात सुप्रियाला कॉल करून श्याम हा मंत्रालयात सचिव असून, नोकरी लावून देत असल्याचे सांगितले. त्यानुसार, विशालच्या घरी श्यामची भेट झाली. श्यामने त्याचे ओळखपत्र दाखवून मंत्रालयात अधिकारी असल्याचे सांगितले. आतापर्यंत अनेकांना नोकरी लावल्याचे सांगून जवळील कागदपत्रेही दाखविली. सुप्रियाला लिपिक पदासाठी भरती सुरू असल्याचे सांगून कागदपत्रे मागवून घेतली. 

महिनाभरात सुप्रियाला मंत्रालयात लिपिक पदाचे नियुक्तीचे पत्र पोस्टाने घरी आले. त्यामुळे तिचा विश्वास बसला. पुढे काही दिवसांत लिपिक पदाची परीक्षा होणार असल्याचे सांगून ७० हजार रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर, विविध कारणांसाठी पैशांची मागणी वाढली. तिने तिच्या शिक्षिकेकडून काही पैसे उसने घेतले. शिक्षिकेला याबाबत समजताच, त्याही श्यामच्या जाळ्यात अडकल्या. त्या पाठोपाठ सुप्रियाच्या एका नातेवाइकालाही वाहन चालक पदी नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. या प्रकरणी तरुणीला व्हिजिटिंग कार्डही देण्यात आले  होते. त्यामध्ये दालन क्रमांकासहित सर्व मजकूर नमूद करण्यात आला होता. मार्च अखेरपर्यंत या तिघांकडून आरोपींनी १६ लाख ३३ हजार रुपये उकळले.

अशी केली टाळाटाळ पैसे देऊन बरेच दिवस उलटल्याने, सुप्रियाने नोकरीवर कधी रुजू होणार, याबाबत विचारणा केली. तेव्हा सध्या जुन्या भरतीची नियुक्तीच्या पत्रांचे वाटप सुरू आहे.  अधिवेशन, ओबीसी आरक्षणापाठोपाठ मुलाचे निधन झाले असल्याचे सांगून टाळाटाळ सुरू केली. याच दरम्यान, आरोपीने अशाच प्रकारे नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची माहिती समजताच, त्यांना धक्का बसला. त्यांनी शनिवारी दादर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. 

आरोपीचा लवकरच ताबा घेणार आरोपीने ठाण्यातही मंत्रालयात नोकरीच्या नावाखाली फसवणूक केली आहे. ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने त्याला अटक केली असून, त्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच त्याचा ताबा घेत, या गुन्ह्यात अटक करण्यात येईल. आरोपींचा मंत्रालयाशी काहीही संबंध नाही.- महेश मुगुटराव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दादर पोलिस ठाणे 

टॅग्स :गुन्हेगारीधोकेबाजी