मुंबई पोलिसांच्या दिमतीला स्थानिकांमधून विशेष पोलीस अधिकाऱ्यांची फाैज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:07 IST2021-04-23T04:07:48+5:302021-04-23T04:07:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लॉकडाऊनचे नियम झुगारून विनाकारण रस्त्यावर भटकणाऱ्या नागरिकांना आवरण्यासाठी, घरी पाठविण्यासाठी पोलिसांनी परिसरातील विश्वासातील तरुणांची ...

Dimti of Mumbai Police gets special police officer from locals | मुंबई पोलिसांच्या दिमतीला स्थानिकांमधून विशेष पोलीस अधिकाऱ्यांची फाैज

मुंबई पोलिसांच्या दिमतीला स्थानिकांमधून विशेष पोलीस अधिकाऱ्यांची फाैज

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लॉकडाऊनचे नियम झुगारून विनाकारण रस्त्यावर भटकणाऱ्या नागरिकांना आवरण्यासाठी, घरी पाठविण्यासाठी पोलिसांनी परिसरातील विश्वासातील तरुणांची फाैज तयार करून त्यांची ‘विशेष पोलीस अधिकारी’ म्हणून नेमणूक केली आहे. ही फाैजही सध्या कार्यरत आहे.

पोलिसांना दैनंदिन कामकाज, गुन्ह्यांचा तपास, आरोपपत्र तयार करण्यापासून कायदा - सुव्यवस्था राखण्याचे आणि संचारबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीचे काम करावे लागत आहे. त्यात अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण वाढत आहे. अनेक पोलिसांना रक्तदाब, मधुमेह, हृदयरोगासारखे आजार आहेत. अनेकांची शारीरिक स्थिती चांगली नाही. अनेकांना आरोग्याच्या समस्या आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत पोलिसांना आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियममधील कलम २१ (१)चा वापर करून तात्पुरत्या स्वरूपात ‘विशेष पोलिसां’ची नेमणूक करण्यात येऊ शकते. कोणत्याही शहराचे पोलीस आयुक्त अथवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किंवा दंडाधिकारी अशा तिघांनाही हे अधिकार आहेत.

याच अधिकाराचा वापर करीत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या आदेशान्वये मुंबईत विशेष पोलीस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जनावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत गर्दीचे नियमन महत्त्वाची जबाबदारी असते. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे विश्वासातील तरुणांना सोबत घेऊन ही जबाबदारी पार पाडली जाते. कोरोनामुळे जारी केलेल्या लॉकडाऊनमध्ये तशीच उपाययोजना करण्यात आली आहे. या वेळी त्यांची ‘विशेष पोलीस अधिकारी’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

स्थानिक पोलिसांची गस्त सतत सुरू असली तरी हद्दीतील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचणे, तिथेच थांबून राहणे शक्य नाही. विशेषत: झोपडपट्टी असलेल्या उपनगरांमध्ये पोलिसांची पाठ फिरताच नागरिक पुन्हा रस्त्यांवर येतात, दुकाने पुन्हा सुरू होतात असा अनुभव आहे. त्यांना घरी पाठविण्यासाठी किंवा गर्दीची माहिती, परिसरातील घडामोडींची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा पोलिसांची मदत होत आहे.

यात, नोकरदार तसेच व्यावसायिक तरुणांचा समावेश आहे. त्या तरुणांना १० ते ३० एप्रिलपर्यंत ‘विशेष पोलीस अधिकारी’ म्हणून नियुक्ती पत्रही देण्यात आले आहे.

Web Title: Dimti of Mumbai Police gets special police officer from locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.