Join us
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; राज्यभरात ६३३ ठिकाणी लागणार ७ हजार सीसीटीव्ही; प्रकल्पासाठी येणार १११ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 06:37 IST

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील ६४ महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही प्रणाली यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे, यामुळे सुरक्षेची नवी दिशा निश्चित झाली आहे.

मुंबई: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने राज्यभरातील ६३३ ठिकाणी ७ हजार ३५ नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी १११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

भारत-फ्रान्समध्ये २१ करार, पंतप्रधान माेदी-राष्ट्राध्यक्ष मॅक्राॅन यांनी मैत्रीच्या नव्या पर्वाला केली सुरुवात

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील ६४ महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही प्रणाली यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे, यामुळे सुरक्षेची नवी दिशा निश्चित झाली आहे. उर्वरित २७ विभाग, तसेच विविध कार्यशाळा आणि कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची पुढील कार्यवाही सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबई येथे उभारण्यात आले असून, त्याची वापरकर्ता स्वीकृती चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या नियंत्रण कक्षातून राज्यभरातील सीसीटीव्हीद्वारे केंद्रीकृत पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे संशयास्पद हालचाल तात्काळ ओळखून आवश्यक कार्यवाही करता येणार आहे.

असे उभारणार जाळे

महामंडळाचा नवीन सीसीटीव्ही प्रकल्पाच्या एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर डिजिटल नजरेचे जाळे उभारले जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत बसस्थानके, आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी यांसारख्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अत्याधुनिक प्रकल्पाची जबाबदारी ई-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड या संस्थेकडे आहे. या प्रकल्पाचा एकूण कालावधी १ वर्ष निश्चित करण्यात आला आहे.

‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हा केवळ कॅमेरे बसविण्याचा उपक्रम नसून, तो एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच देणारा आणि प्रवाशांच्या विश्वासाला नवे बळ देणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.

प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

या प्रकल्पामुळे एसटीच्या बसस्थानकांवर आणि कार्यालयांमध्ये सुरक्षिततेचे नवे पर्व सुरू होणार आहे. प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होणार असून, कोणत्याही अनुचित घटनांवर त्वरित नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ST Buses to Get Digital Security with CCTV Network

Web Summary : Maharashtra ST Corporation will install 7,035 CCTV cameras at 633 locations statewide for enhanced security. The project costs ₹111 crore and includes a central control room in Mumbai for real-time monitoring, ensuring passenger safety and preventing incidents.
टॅग्स :प्रताप सरनाईक