डायरियाने मुलगा दगावला
By Admin | Updated: July 7, 2015 01:53 IST2015-07-07T01:53:07+5:302015-07-07T01:53:07+5:30
पनवेल तालुक्यातील वळप गावात डायरियाची भीषण साथ पसरली आहे. एक रुग्ण दगावला असून महेश श्रवन शर्मा (५) असे त्याचे नाव आहे

डायरियाने मुलगा दगावला
पनवेल : पनवेल तालुक्यातील वळप गावात डायरियाची भीषण साथ पसरली आहे. एक रुग्ण दगावला असून महेश श्रवन शर्मा (५) असे त्याचे नाव आहे. गावातल्या एका बोअरवेलमधील दूषित पाण्यातून ही साथ पसरली. घटनेची दखल घेत, प्राथमिक आरोग्य केंद्र वावंजे यांनी गावात शिबिर घेऊन रुग्णांना प्राथमिक उपचार देण्यास सुरुवात केली आहे. मात्र गावात ही साथ झपाट्याने पसरली असून रुग्णांना उलट्या, जुलाब होत आहेत. गावातल्या १६ रुग्णांवर पनवेल शहरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर २१ रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
ज्या बोअरवेलमधील पाणी प्यायल्याने ही साथ पसरली, ती बंद करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. चव्हाण यांनी दिली. बोअरवेलच्या आजूबाजूच्या परिसरात केरकचरा पडला आहे. तो कुजून जमिनीत मुरल्याने ही बाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बोअरवेलचे मालक रतन पांडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मृत्युमुखी पडलेला मुलगा महेश शर्मा याचे कुटुंबीय तिथे भाड्याने राहतात. घरमालक केवळ भाडे घेण्यासाठी येत असून सुविधा व स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. वळप गाव हे नवीन पनवेलपासून जवळच आहे. तरी देखील याठिकाणी नळ योजना पोहोचली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)