डायलेसिसच्या रुग्णाला बनवले क्षयरोगी
By Admin | Updated: March 24, 2015 00:52 IST2015-03-24T00:52:19+5:302015-03-24T00:52:19+5:30
पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात डायलेसिसच्या रुग्णाला चक्क टीबी रुग्णाची फाईल देऊन पाठवण्यात आले. हा धक्कादायक प्रकार हॉस्पिटलच्या लक्षात आल्याने पुढचा अनर्थ टळला.

डायलेसिसच्या रुग्णाला बनवले क्षयरोगी
मनीषा म्हात्रे ल्ल मुंबई
पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात डायलेसिसच्या रुग्णाला चक्क टीबी रुग्णाची फाईल देऊन पाठवण्यात आले. हा धक्कादायक प्रकार हॉस्पिटलच्या लक्षात आल्याने पुढचा अनर्थ टळला.
चेंबूरचे ५८ वर्षीय अर्जुन राजगुरू हे डायलेसिसचे रुग्ण आहेत. त्यांंच्या दोन्हीही किडन्या खराब झाल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरा त्यांना श्वसनाचा त्रास झाला म्हणून त्यांंच्या कुटुंबीयांनी त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार घेतल्यानंतर त्यांना सोमवारी जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा राजगुरू यांंच्यावर योग्य उपचार होत नसल्याने त्यांंची प्रकृती खालावत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मंगळवारी, सकाळी दहाच्या सुमारास तेथील परिचारिकेने ३५ वर्षीय क्षयरोगग्रस्त रुग्णाची फाईल त्यांच्या कुटुंबीयांच्या हातात देऊन डिस्चार्ज दिला. राजगुरू हे कुटुंब अशिक्षित असल्याने ही बाब त्यांच्या निदर्शनास आली नाही.
पुढील उपचारासाठी अर्जुन यांना चेंबूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडून घेतलेल्या माहितीतून ही बाब समोर आली. त्यात उशिरा जाग आलेल्या राजावाडी रुग्णालय प्रशासनाने चूक लपविण्यासाठी अर्जुन यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून तुम्ही चुकीचे रिपोर्ट नेले, आणून परत द्या, असे सांगितले. तेव्हा नेमके काय झाले, हेच कळेनासे झाल्याचे राजगुरू यांंचा मुलगा मिलिंद राजगुरू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रुग्णालय प्रशासनाचा हा निष्काळजीपणा रुग्णांंच्या जिवावर बेतण्याची शक्यता होती. पण वेळीच चुकीची फाइल गेल्याचे समजले, अन्यथा चुकीच्या उपचारांचा नाहक फटका सहन करावा लागला असता, असे नातेवाइकांनी बोलून दाखवले.
संबंधित परिचारिकेला मेमो...
दिवसाला ७० हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. राजगुरू यांच्या बाबतीत चुकीची फाइल गेली, याची माहिती मिळताच, तत्काळ दखल घेत त्यांंच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्यात आला. यामध्ये जबाबदार असलेल्या संबंधित परिचारिकेवर कारवाई करत त्यांना मेमो देण्यात आला आहे.
- डॉ. विद्या ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय, घाटकोपर