उरणमध्ये खटाऱ्याला ‘दे धक्का’
By Admin | Updated: October 20, 2014 03:26 IST2014-10-20T03:26:59+5:302014-10-20T03:26:59+5:30
विधानसभा मतदारसंघात शेकापचे उमेदवार आमदार विवेक पाटील यांचा सेनेचे मनोहरशेठ भोईर यांनी ८११ मतांनी पराभव केला.

उरणमध्ये खटाऱ्याला ‘दे धक्का’
उरण : विधानसभा मतदारसंघात शेकापचे उमेदवार आमदार विवेक पाटील यांचा सेनेचे मनोहरशेठ भोईर यांनी ८११ मतांनी पराभव केला. शेकापच्या पराभवामुळे पहिल्यांदाच उरणाचा आमदार मिळाल्याने उरणकरांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
आघाड्या-युती संपुष्टात आल्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने उरण मतदारसंघातील निकालाकडे साऱ्यांच्याच नजरा होत्या. उरणकरांना उरणबाहेरील आमदार नको, तर हक्काचा उरणचाच आमदार हवा यासाठी मतदारही आग्रही होते. शिवसेनेनेही स्थानिक कार्यकर्ते मनोहरशेठ भोईर यांना उमेदवारी देऊन आघाडी घेतल्यानंतर भाजप, मनसे राष्ट्रवादीनेही स्थानिक उमेदवारांनाच रिंगणात उतरविले, मात्र उरणकरांनी कार्यक्षम, प्रामाणिक, समाजसेवी मनोहरशेठ भोईर यांना पसंती दिली.
तब्बल २४ फेऱ्यांपर्यंत चाललेल्या मतमोजणीत शेकाप आणि सेनेच्या उमेदवारांमध्ये विजयासाठी चांगलीच चुरस लागली होती. १८ व्या फेरीपर्यंत तर शेकापचे विवेक पाटील यांनी ५ हजार मतांची घसघशीत आघाडी कायम ठेवली, मात्र १८ व्या फेरीपासून सेनेला आघाडी कमी करण्यात यश मिळाले आणि आघाडी घेत शेकापचे उमेदवार विवेक पाटील (५५३२०) यांचा सेनेचे उमेदवार मनोहरशेठ भोईर (५६१३१) यांनी ८११ मतांनी पराभव केला. (वार्ताहर)