धवल टूर्सने सहल रद्द करून प्रवाशाचे केले नुकसान
By Admin | Updated: March 16, 2015 01:54 IST2015-03-16T01:54:57+5:302015-03-16T01:54:57+5:30
नियोजित सहल पूर्वसूचना न देता रद्द करणाऱ्या आणि प्रवाशाचे बुकिंगचे पैसेही परत न करणाऱ्या धवल टूर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २० हजारांचा दंड ठोठावला आहे.

धवल टूर्सने सहल रद्द करून प्रवाशाचे केले नुकसान
ठाणे : नियोजित सहल पूर्वसूचना न देता रद्द करणाऱ्या आणि प्रवाशाचे बुकिंगचे पैसेही परत न करणाऱ्या धवल टूर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २० हजारांचा दंड ठोठावला आहे.
ठाणे येथे राहणारे आनंद सारडा यांनी धवल टूर्सकडे एप्रिल २०११ मधील काश्मीर-वैष्णोदेवी सहलीसाठी बुकिंग केले आणि आॅफिसमधून रजा मंजूर करून घेतली. त्यासाठी १४ आणि १५ फेब्रुवारीला त्यांनी अनुक्रमे आगाऊ ५ हजार आणि १५ हजार टूर्सकडे जमा केले. त्यानंतर, त्यांनी नियोजित सहलीविषयी टूर्सकडे विचारणा केली असता उत्तर मिळाले नाही. सातत्याने चौकशी केल्यावर टूर्सने सहल रद्द केल्याचे सांगितले. तर सारडा यांना त्यांची रक्कमही परत दिली नाही. त्यामुळे त्यांनी टूर्सविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार केली.
कागदपत्रे, घटना यांची पडताळणी केली असता त्यांनी १४ फेब्रुवारीला टूर रजिस्ट्रेशन फॉॅर्म भरून आगाऊ २० हजार दोन टप्प्यांत दिले होते. मात्र, टूर्सने त्यांना माहिती न देता सहल रद्द केली. तसेच त्यांचे पैसेही दिले नाही. बुकिंग प्रोसिजरमधील क्लॉजनुसार टूर्सने सहल रद्द केल्यास संपूर्ण बुकिंग रक्कम परत दिली पाहिजे, असे मंचाने स्पष्ट केले. त्यानुसार, धवल टूर्सने सारडा यांना त्यांची रक्कम २० हजार आणि नुकसानभरपाई २० हजार द्यावी, असे आदेश मंचाने दिले आहेत. (प्रतिनिधी)