आपला दवाखान्याचे काम थांबावणाऱ्या एअरपोर्ट ऑथोरिटीच्या खाजगी सुरक्षा रक्षकांच्या विरोधात धरणे आंदोलन
By मनोहर कुंभेजकर | Updated: May 12, 2023 19:04 IST2023-05-12T19:04:31+5:302023-05-12T19:04:40+5:30
सदर काम एअरपोर्ट ऑथोरिटीच्या खाजगी सुरक्षा रक्षकांनी जबरदस्ती थांबिवले आहे

आपला दवाखान्याचे काम थांबावणाऱ्या एअरपोर्ट ऑथोरिटीच्या खाजगी सुरक्षा रक्षकांच्या विरोधात धरणे आंदोलन
मुंबई-प्रभाग क्रमांक ८२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या वतीने अंधेरी (पूर्व ) मरोळ रामलीला मैदान, लेलेवाडी येथे सामान्य जनतेसाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बांधण्याचे काम चालू होते. परंतु सदर काम एअरपोर्ट ऑथोरिटीच्या खाजगी सुरक्षा रक्षकांनी जबरदस्ती थांबिवले आहे. तसेच नवपाडा, मरोळ पाइप लाइन, सहार विभागांत ठिकठिकाणी पत्रे लावून, घराचं दुरुस्तीचं काम चालू असेल ते थांबवून, पाण्याची लाईन टाकायचं काम चालू असेल ते थांबवून वारंवार त्रास दिला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
त्यामुळे अशा प्रववृत्तीना आळा बसावा तसेच आपला दवाखान्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे या मागणीसाठी ह्याकरता शिवसेना - भाजपा - रीपाई महायुतीच्या वतीने शिवसेना उपनेते कमलेश राय यांच्या नेतृत्वामध्ये आज धरणे आंदोलन छेडण्यात आले.यावेळी शिवसैनिक,स्थानिक समाजसेवक, नागरिक तसेच विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला
सदर जागा ही एअरपोर्ट ऑथोरीटीच्या अंतर्गत आहे. परंतु, महानगरपालिका, एअरपोर्ट ऑथोरीटी, एम. एम. आर. डी. ए. आणि एम. आय. ए. एल. यांच्या मध्ये झालेल्या करारानुसार मुंबई मध्ये ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्टी वस्ती आहे त्या त्या ठिकाणी सामान्य जनतेला मूलभूत सुविधा उदा. साफसफाई, पाणी, गटार, नाला, एच. बी. टी. क्लिनिक व इतर आवश्यक मूलभूत सुविधा पुरविण्याचे काम महानगरपालिका करेल. यासाठी महानगरपालिकेला कोणाकडूनही परवानगी अथवा ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. तरी सुद्धा वारंवार काम थांबवण्यात येते अशी माहिती कमलेश राय यांनी दिली.
सदर आंदोलनामध्ये वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा,शिवसेना विभागसंघटीका वृंदाताई मोघे, विभागप्रमुख (मागासवर्गीय),उपविभागप्रमुख मोहन कदम व दिपक नाईक,मुंबई प्रदेश, रिपाई (आठवले) उपाध्यक्ष रतन अस्वारे,युवा नेते रितेश राय,शाखा संघटीका धनलक्ष्मी पटेल,शाखा समन्वयक प्रितेश सुवर्णा, शाखा संघटिका, आशा वाघेकर तसेच विभागातील नागरिक उपस्थित होते.