धारावीकरांना मुंबईतील अन्य कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पापेक्षा जास्त चटईक्षेत्र मिळणार

By सचिन लुंगसे | Published: January 15, 2024 03:05 PM2024-01-15T15:05:22+5:302024-01-15T15:06:00+5:30

पात्र निवासी सदनिका धारकांना १७ टक्के अतिरिक्त म्हणजे ३५० चौरस फूट जागा मिळणार

dharavikar will get more area than any other slum rehabilitation project in mumbai | धारावीकरांना मुंबईतील अन्य कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पापेक्षा जास्त चटईक्षेत्र मिळणार

धारावीकरांना मुंबईतील अन्य कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पापेक्षा जास्त चटईक्षेत्र मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:धारावीमधील पात्र रहिवाशांना स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालये असलेले किमान ३५० चौरस फूट आकाराचे घर मिळणार आहे, अशी घोषणा अदानी  समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) या  विशेष हेतू कंपनीने आज केली.  धारावीतील घराचे हे क्षेत्रफळ मुंबईतील अन्य झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल १७ टक्के अधिक आहे.

सर्व धारावीकरांसाठी नवीन सदनिका या स्वप्नातील घरे असतील आणि त्यांचे राहणीमान उंचावतील. धारावीकरांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब प्रत्येक घरात दिसेल. सर्वसामान्य मुंबईकरांच्या भावनांमध्ये ते नेहमीच दिसत असते. धारावी पुनर्वसन प्रकल्पात धारावीचा आत्मा अबाधित राखून ही स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रा. लि. च्या (डीआरपीपीएल) प्रवक्त्याने सांगितले.

पात्र निवासी सदनिका म्हणजे १ जानेवारी, २००० च्या आधी अस्तित्वात असलेल्या सदनिका आहेत. प्रत्येक फ्लॅटमध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर आणि स्वतंत्र शौचालय असेल आणि हे फ्लॅट्स सुरक्षित असण्यासोबतच त्यात चांगला उजेड असेल. ते हवेशीर आणि आरोग्यदायी असतील.

धारावीची चैतन्यमय आणि वेगळी उद्योजकीय संस्कृती अबाधित ठेवून धारावीचा व्यावसायिक आणि औद्योगिक परिसर म्हणून विकास करण्याचा व जागतिक स्तरावर जोडलेले शहर बनवण्याचा डीआरपीपीएलचा प्रयत्न आहे. धारावीकरांचे जीवनमान उंचावणे, आर्थिक संधी, भविष्य घडविणारे शिक्षण तसेच व्यावसायिक प्रशिक्षण, आधुनिक आरोग्य सुविधा आणि दर्जेदार जीवनशैली हे सारे धारावी आणि नवी धारावी येथे उपलब्ध असेल. त्यांच्यासाठी सामाजिक सभागृहे, मनोरंजन क्षेत्र, सार्वजनिक उद्याने, दवाखाने आणि मुलांसाठी संगोपन केंद्रेदेखील असतील.

धारावीतील अपात्र निवासी सदनिका धारकांना महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार प्रस्तावित, परवडणाऱ्या भाड्याच्या गृहनिर्माण धोरणांतर्गत निवासस्थान देण्यात येईल. यासाठी, मोठ्या संख्येने झोपड्यांमध्ये असलेल्या रहिवाशांच्या अनेक गरजा लक्षात घेऊन नव धारावीमध्ये, धारावीसारखा विकास करण्यात येईल.

डीआरपीपीएलने धारावीचा कायापालट करण्याचे आव्हान स्वीकारले असून या बहुप्रतिक्षित परिवर्तन प्रकल्पासाठी सर्व हिस्सेधारकांकडून मिळणारा पाठिंबा आमच्यासाठी बहुमूल्य आहे. त्यातून सिंगापूर आणि इतर प्रगत राष्ट्रांमध्ये अशा योजनांसाठी ज्या प्रक्रिया पाळल्या जातात त्यांचे सर्वोत्तम पद्धतीने असे पालन करण्यात येईल की, उर्वरित जगासाठी झोपडपट्टी पुनर्वसन आणि शहरी पुनरुज्जीवनाचे नवे मानदंड निश्चित होतील.

Web Title: dharavikar will get more area than any other slum rehabilitation project in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.