धारावी पुनर्विकासाचे घोंगडे भिजतच
By Admin | Updated: October 5, 2015 02:58 IST2015-10-05T02:58:01+5:302015-10-05T02:58:01+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी पुनर्विकास प्राधिकरणाच्या बैठकीत धारावीकरांचे ४00 चौरस फुटांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई विमानतळ प्राधिकरणासोबत बैठक घेण्याचे सूचित केले होते

धारावी पुनर्विकासाचे घोंगडे भिजतच
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी पुनर्विकास प्राधिकरणाच्या बैठकीत धारावीकरांचे ४00 चौरस फुटांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई विमानतळ प्राधिकरणासोबत बैठक घेण्याचे सूचित केले होते. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप विमानतळ प्राधिकरणासोबत बैठक न झाल्याने धारावी पुनर्विकासाचे घोंगडे भिजत पडले आहे. धारावीकरांना ४00 चौरस फुटाचे घर देण्याची सत्ताधारी मागणी करीत असले तरी डीआरपी आणि गृहनिर्माण विभागातील अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळत आहेत.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी राज्य शासनाने धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्यानुसार धारावीकरांना ३00 चौरस फुटाचे घर देण्यात येणार आहे. परंतु निवडणुकीच्या कालावधीत सेना-भाजपाकडून धारावीकरांना ४00 चौरस फुटाचे घर देण्याचे आश्वासन दिल्याने सत्तेत आल्यानंतर ते आश्वासन सत्ताधाऱ्यांना पाळावे लागणार आहे. निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वी धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची बैठक घेतली होती.
या बैठकीत धारावीकरांना ४00 चौरस फुटाचे घर देण्यासाठी विमानतळ प्राधिकरणासोबत धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत धारावीत ३0 मजली इमारती उभारणे शक्य आहे काय, याबाबत विचारविनियम करण्यात येणार होता. ३0 मजली इमारती उभारल्यास धारावीकरांचे ४00 चौरस फुटाचे स्वप्न पूर्ण होईल, असा सत्ताधाऱ्यांचा अंदाज आहे. विमानतळ प्राधिकरणाने ३0 मजली इमारती उभारण्यास परवानगी दिल्यास धारावीकरांचे स्वप्न पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)