Join us

धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला; ८५० कुटुंबांना घरे, ३००० झोपडीधारकांचे पुनर्वसन होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 06:18 IST

धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडतर्फे माटुंगा येथील आपीएफ मैदानावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पाडला.

मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रेल्वे स्थानकानजीकच्या सेक्टर ६ मधील क्वॉर्टर्समध्ये राहणाऱ्या ८५० कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार असून, त्यासाठी आता आहे त्या जागेवर नव्या तीन इमारती बांधल्या जाणार आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत हे काम केले जाणार असून, या कामाचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला.

नव्या तीन इमारतींचे काम तीन वर्षांत पूर्ण होईल, असा दावा धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने केला असून, याव्यतिरिक्त याच जागेवरील सुमारे ३ हजार झोपडीधारकांनाही नवे घर दिले जाणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पावर सातत्याने टीकेची झोड उठत असतानाच राज्य सरकारने अदानी समूहावर धारावी पुनर्विकासाचे काम सुरू आहे. त्यानुसार, धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडतर्फे माटुंगा येथील आपीएफ मैदानावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पाडला. सेक्टर ६ या भागात झालेल्या भूमिपूजनाने रेल्वे कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आणि कार्यालये उभारण्याच्या कामाचाही शुभारंभ झाला. धारावी पुनर्विकासाच्या निविदेनुसार, ही रेल्वे कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आणि कार्यालये सरकारकडे हस्तांतरित केली जाणार आहेत.

अपात्र व्यक्तीलाही घर  अपात्र रहिवाशांना विभागले आहे. १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ दरम्यानच्या कालावधीतील रहिवाशांना परवडणाऱ्या किमतीत मालकीची घरे दिली जातील. २०११ नंतरच्या घरधारकांना राज्य सरकारच्या परवडणाऱ्या भाड्याच्या घरांच्या धोरणानुसार घरे दिली जातील. ज्यात भाड्याने घर घेऊन नंतर विकत घेण्याचा पर्याय असेल. या अपात्र रहिवाशांना मुंबईत इतरत्र तयार करण्यात येणाऱ्या आधुनिक शहरात स्थालांतरित केले जाईल. सुमारे ३ हजार झोपडीधारकांनादेखील हेच निकष लागू असणार आहेत.

गुपचूप उरकला कार्यक्रम!भूमिपूजन ७ सप्टेंबर २०२४ रोजी करण्याचा घाट घालण्यात आला होता. धारावी बचाव आंदोलनाने आंदोलनाचा इशारा देताच हा कार्यक्रम रद्द करून तो १२ सप्टेंबर रोजी करण्याचे ठरले. १२ सप्टेंबरचा भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा आम्ही दिला होता. ११ सप्टेंबरचे उपोषण झाले. उपोषणावेळी प्रशासनाने पोलिसांना निरोप पाठविला की १२ सप्टेंबरचे भूमिपूजन रद्द केले आहे. त्यामुळे उपोषणाचा कार्यक्रम आटोपता घेत डीआरपीपीएलने दिलेली माहिती आणि पोलिसांची विनंती यांना मान देत १२ तारखेचे आंदोलन स्थगित केले. आता भूमिपूजनाचा कार्यक्रम गुपचूप उरकला आहे. त्यामुळे धारावीकरांना धारावीबाहेर हुसकावून लावले जाईल असे धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक ॲड. राजेंद्र कोरडे यांनी सांगितले.

टॅग्स :धारावी