Join us  

बोरीवलीत राबवला जातोय धारावी पॅटर्न; रुग्णसंख्या कमी करण्याचे मिशन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 3:56 AM

या परिमंडळात आर दक्षिण, आर मध्य व आर उत्तर हे तीन वॉर्ड येतात. येथील सहायक आयुक्त, आरोग्य अधिकारी व संबंधित कर्मचारी यांनी येथील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसली आहे.

मुंबई : उत्तर मुंबईतील परिमंडळ ७च्या अखत्यारीत येत असलेल्या कांदिवली, बोरीवली व दहिसरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धारावी पॅटर्न राबवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. कोरोना रुग्णांना लवकर शोधून काढण्यासाठी या भागात नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेऊन सारो टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ ७चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी ‘लोकमत’ला दिली.

या परिमंडळात आर दक्षिण, आर मध्य व आर उत्तर हे तीन वॉर्ड येतात. येथील सहायक आयुक्त, आरोग्य अधिकारी व संबंधित कर्मचारी यांनी येथील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसली आहे. धारावी पॅटर्नच्या धर्तीवर येथील नागरिकांच्या घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करणे, मोबाइल स्क्रिनिंग करणे, लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करणे, कंटेन्मेंट झोनमध्ये पोलिसांच्या मदतीने प्रभावीपणे लॉकडाऊन करणे, क्वारंटाइन सेंटरची अंमलबजावणी करणे, जर इमारतीत कोरोना रुग्ण आढळला तर संपूर्ण इमारत सील करणे आदी कामे युद्धपातळीवर करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त शंकरवार यांनी दिली. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार चेस द व्हायरस व मिशन झिरो मोहीम या परिमंडळात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या परिमंडळात आर दक्षिणमध्ये २५, आर मध्यमध्ये १३ व आर उत्तरमध्ये ९३ असे एकूण १३१ फिव्हर शिबिर घेण्यात आली तर या परिमंडळात १५५ ज्येष्ठ नागरिकांना आॅक्सिजनची गरज भासल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस