धमा‘केदार’ विनोदाचे अस्सल ‘भरत’काम

By Admin | Updated: April 18, 2015 23:09 IST2015-04-18T23:09:35+5:302015-04-18T23:09:35+5:30

भरत जाधवसारखा हुकमी एक्का हातात असल्यावर नाटकाने अर्धी बाजी जिंकल्यातच जमा असते. त्यातच त्याला केदार शिंदेची साथ असेल,

DhamaKedar 'Good of humor' Bharat 'work | धमा‘केदार’ विनोदाचे अस्सल ‘भरत’काम

धमा‘केदार’ विनोदाचे अस्सल ‘भरत’काम

भरत जाधवसारखा हुकमी एक्का हातात असल्यावर नाटकाने अर्धी बाजी जिंकल्यातच जमा असते. त्यातच त्याला केदार शिंदेची साथ असेल, तर या जमेत अजूनच वाढ होते. या दोघांचे रसायन नाटकात जुळून आल्यावर जे काही निर्माण होते, तो केवळ धुमाकूळ ठरतो. याचीच पुनरावृत्ती श्रीमंत दामोदरपंत या नाटकातही झालेली दिसते आणि हे नाटक चेहऱ्यावरचे हास्य ढळू न देण्याची किमया करत ‘धमाके’दार विनोदाचे अस्सल ‘भरत’काम विणते.
एका जुन्या वाड्यात यातले नाट्य घडते. या वाड्यात राहणाऱ्या दामूच्या अंगात त्याचे पूर्वज श्रीमंत दामोदरपंत, म्हणजेच त्याचे आजोबा रोज संचार करतात. दामूच्या शरीरात प्रवेश करण्याची त्यांची वेळही ठरलेली असते. रोज संध्याकाळी सहा वाजल्यानंतर दामू हा दामू राहतच नाही; तर त्याचा पार कायापालट होतो आणि तो वाडा श्रीमंतांच्या अस्तित्वाने भारून जातो. दामूसोबत अण्णा, माई, बहीण सुमन, भाऊ विजय व त्याची बायको नयना असे सर्वजण राहतात. संध्याकाळच्या श्रीमंतांच्या भरणाऱ्या दरबाराने हे सगळे पार त्रासलेले असतात, याचे कारण म्हणजे श्रीमंतांचा असलेला दरारा! त्यांचा मानमरातब राखताना या सगळ्यांची केविलवाणी स्थिती होते. त्यातच दामोदरपंतांकडून अण्णांना रोज एक श्रीमुखात मिळत असते ती वेगळीच; परंतु श्रीमंतांच्या धाकापुढे कुणाचेच काही चालत नाही. या सर्व मंडळींची रोजच्या रोज उडणारी तारांबळ म्हणजे श्रीमंत दामोदरपंत हे नाटक आहे.
पदोपदी हशे वसूल करणारी केदार शिंदेची संहिता आणि त्यानेच त्याच्या हातखंडा पद्धतीने केलेले दिग्दर्शन हा या नाटकाचा प्लस पॉइंट आहे. त्याच्या जोडीला भरत जाधव असणे म्हणजे बोनसच ! या दोघांची केमिस्ट्री हमखास जुळून येते, हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहे. हे नाटकही त्याला अपवाद नाही. भरतच्या साथीने केदारने हे नाटक अक्षरश: पळवले आहे आणि जागोजागी पंच वापरत विनोदाची मनसोक्त पेरणी केली आहे.
दामू आणि दामोदरपंत अशा दोन्ही भूमिकांमध्ये भरत जाधवने मस्त खेळी खेळली आहे. बावळट दामू ते श्रीमंत दामोदरपंत ही त्याच्या अभिनयाची रेंज वाखाणण्याजोगी आहे. भरत जाधवच्या चाहत्यांसाठी हे नाटक म्हणजे भरपेट मेजवानी आहे. पण या नाटकात अण्णांची भूमिका साकारणाऱ्या जनार्दन लवंगारे यांनी भरतला भारी टक्कर दिली आहे. त्यांचे पात्र संपूर्ण नाटकभर वावरते आणि त्याचा उपयोग करून घेत त्यांनी त्यांचा प्रभाव पाडला आहे. मालविका मराठे यांच्या वाट्याला आलेल्या माईच्या भूमिकेत त्यांनी छान रंग भरले आहेत. दामूला सतत पाठीशी घालणारी श्रद्धाळू अशी माई त्यांनी गोड साकारली आहे. मनोज टाकणे (विजय), मृणालिनी जावळे (नयन), अनिता शिंदे (सुमन), जयराज नायर (शृंगारपुरे), स्वप्निल फडके (मोहन) या कलावंतांची सुयोग्य साथ नाटकाला लाभली आहे. प्रकाश मयेकर यांनी उभारलेला वाडा, त्याची रंगसंगती आकर्षून घेणारी आहे. ओंकार दत्त यांची वेशभूषा लक्षवेधी आहे. हशा आणि टाळ्यांच्या संगतीने पुनर्प्रत्ययाचा आनंद देण्यात हे नाटक यशस्वी झाले आहे.

च्पदोपदी हशे वसूल करणारी केदार शिंदेची संहिता आणि त्यानेच त्याच्या हातखंडा पद्धतीने केलेले दिग्दर्शन हा या नाटकाचा प्लस पॉइंट आहे.
च्त्याच्या जोडीला भरत जाधव असणे म्हणजे बोनसच ! या दोघांची केमिस्ट्री हमखास
जुळून येते हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहे.

Web Title: DhamaKedar 'Good of humor' Bharat 'work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.