हद्द विस्तारीकरणाचा प्रस्ताव धूळखात

By Admin | Updated: August 18, 2014 01:11 IST2014-08-18T01:11:33+5:302014-08-18T01:11:33+5:30

कायदा आणि सुव्यवस्था त्याचबरोबर अपघाताच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी लोहमार्ग पोलिसांची हद्द रोहा रेल्वे स्थानकापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव गृहविभागाकडे धूळ खात पडला आहे.

Dhadda proposes extension of land | हद्द विस्तारीकरणाचा प्रस्ताव धूळखात

हद्द विस्तारीकरणाचा प्रस्ताव धूळखात

प्रशांत शेडगे, पनवेल
कायदा आणि सुव्यवस्था त्याचबरोबर अपघाताच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी लोहमार्ग पोलिसांची हद्द रोहा रेल्वे स्थानकापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव गृहविभागाकडे धूळ खात पडला आहे. गेल्या अनेक वर्षापासून याबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, पनवेल तालुक्यापासून रेल्वेच्या पुढच्या टप्प्यांची जबाबदारी रायगड पोलिसांवर असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
पनवेलमध्ये उपनगरीय रेल्वे सेवा १५ वर्षापूर्वी सुरू झाली असली तरी दिवा-रोहा हा लोहमार्ग जुना आहे. या मार्गाने ठाणे आणि रायगड जिल्ह्याला जोडण्यात आले. पूर्वी ठाणे आणि मुंबईला जाण्यासाठी पनवेल, पेण परिसरातील प्रवासी याच मार्गाचा वापर करीत आहेत. दिवा -पनवेल-रोहा या गाडीने प्रवास करणाऱ्यांची संख्या आजही मोठ्या प्रमाणात आहे. पनवेलहून रायगडात जाण्यासाठी प्रवासी याच रेल्वे गाडीने ये-जा करतात. याचे कारण म्हणजे बाय रोडपेक्षा जलद प्रवास आणि तिकीटाचे दरही स्वस्त आहेत. पनवेल ते रोहा हे अंतर सुमारे ७० कि.मी. असून याच मार्गावरून कोकण आणि दक्षिणेकडील राज्यात रेल्वे गाड्या जातात. परिणामी, या मार्गावरून रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यातील काही गाड्या रायगडातील रेल्वेस्थानकावर थांबतात, त्यामुळे स्थानिक रेल्वे स्थानकांवरही प्रवाशांची गर्दी दिसून येते.
मुंबई ते रोहा असा मध्यरेल्वेचा विस्तार असून पनवेलपासून रोहा सुमारे ६५ कि.मी अंतरावर आहे. रोह्याच्या पुढे कोकण रेल्वेची हद्द सुरू होत असून या मार्गाचे मेंटेनन्स आणि इतर तांत्रिक बिघाड दुरुस्तीची जबाबदारी कोकण रेल्वेवर आहे. असे असले तरी दिवा-रोहा या गाडीने स्थानिक प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात.
पनवेल ते रोहा या दरम्यान अनेक रेल्वेस्थानके असून या ठिकाणीही पॅसेंजर गाड्या थांबतात. प्रवाशांची वाढती वर्दळ असलेल्या या मार्गावर कायदा आणि सुव्यवस्थेचा भार देण्यात आला आहे. रायगड पोलिसांवर स्थानिक भार अधिक असल्याने रेल्वेमार्गाचा अतिरिक्त भार त्यांना सोसावा लागतो आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रेल्वे मार्गाच्या हद्दीत होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश येते. लोहमार्ग पोलिसांवर फक्त रेल्वेच्या हद्दीतील जबाबदारी असल्याने त्यांचा गुन्हेगारांवर वचक आहे. पनवेल लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत फारसे गुन्हे घडत नसून घडले तर त्वरित त्यांना जेरबंद केले जात आहे.
या भागात लोहमार्ग पोलिसांची हद्द नसल्याने गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेक मर्यादा येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर या भागात अपघात झाल्यानंतर जखमींना मदत आणि बचाव कार्यासाठी अनेक अडचणी येतात. रायगड पोलिसांना कामाचा व्याप जास्त असल्याने त्यांना वेळेत पोहचणे अशक्य होते.
या सर्व गोष्टींचा विचार करून लोहमार्ग पोलिसांची हद्द रोह्यापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सहा वर्षापूर्वी सादर करण्यात आला होता. इतकेच काय तर रागयड पोलिसांचीही नाहरकत मागविण्यात आली होती. परंतु ही फाईल गृह विभागाकडे धूळ खात पडली आहे.

Web Title: Dhadda proposes extension of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.