श्रद्धेने केलेली आराधना सुफलच---महालक्ष्मीचा--इतिहास बदलतोय !भाग - ६

By Admin | Updated: September 19, 2014 00:18 IST2014-09-18T23:36:33+5:302014-09-19T00:18:27+5:30

शालूचा स्वीकार मातृभावनेतून : श्रीपूजक, नागरिकांकडून ‘लोकमत’चे अभिनंदन

Devotional worship superfluous --- Mahalaxmi - history can change! Part - 6 | श्रद्धेने केलेली आराधना सुफलच---महालक्ष्मीचा--इतिहास बदलतोय !भाग - ६

श्रद्धेने केलेली आराधना सुफलच---महालक्ष्मीचा--इतिहास बदलतोय !भाग - ६

कोल्हापूर : भक्ताने आपल्या आराध्याला कोणत्याही रूपात पूजले तरी ही आराधना नेहमी सुफल संपूर्णच होते. सगळ्याच देवता आदिमायेचेच रूप आहेत; त्यामुळे अंबाबाईला शक्तिपीठ म्हणा, कुणी आदिमाया, जगदंबा, पद्मावती किंवा लक्ष्मी म्हणतील; त्यामुळे तिचे माहात्म्य कमी होणार नाही. त्यामुळे तिरूपती बालाजी देवस्थानने या मातृदेवतेला श्रद्धेय भावनेतून पाठविलेल्या महावस्त्राला (शालू) असलेले धार्मिक महत्त्व मोलाचेच आहे.
कोल्हापूरच्या महालक्ष्मी तथा अंबाबाईचे आद्यशक्तिपीठ हे मूळ स्वरूप कायम ठेवताना तिरूपती देवस्थानच्या श्रद्धेय भावनांचाही कोल्हापूरकरांना तितकाच आदर आहे. अज्ञानातून काही प्रथा नव्याने सुरू झाल्या आहेत. मात्र, तिरूपती देवस्थानशी या मंदिराला जोडल्याने येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून भविष्यात कोल्हापूरचा विकास होण्यासाठी ही गोष्ट पूरक आहे. फक्त तिरूपती बालाजीची पत्नी म्हणून नव्हे, तर आद्यशक्ती (आई) म्हणून या शहराला तिरूपती देवस्थानशी जोडले जायला हवे, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी दिल्या. याशिवाय श्रीपूजक, कोल्हापूरकरांसह सांगली, निपाणी येथील कित्येक नागरिकांनी पत्रे आणि दूरध्वनीद्वारे मालिकेबद्दल ‘लोकमत’चे अभिनंदन केले. (प्रतिनिधी) (समाप्त)

अंधानुकरण नकोच
तिरूपती देवस्थानने त्या काळी अंबाबाईसह अन्य शक्तिपीठांनाही साडी पाठविली होती. नंतर देवस्थान समितीनेच ही पद्धत सुरू केली. माझ्या काळात सखारामबापूंनी ‘तुम्ही काय ही महालक्ष्मी म्हणून नवीन पद्धत सुरू केली? ही देवी अंबाबाई आहे,’ असे सांगून मला मंदिराच्या दरवाजावर ‘अंबाबाई’ असा फलक लावायला लावले होते. अशी खरी माहिती सांगणारी अनेक मंडळी आजही आहेत. उद्या तिरूपतीप्रमाणेच मंद प्रकाशात देवीचे दर्शन घडवा, असे सांगितले गेले तर तेही आपण मान्य करू का? देवीची महाराष्ट्रीयरूप अबाधित राखले गेले पाहिजे. केवळ मार्के टिंगसाठी अन्य देवस्थानांचे अंधानुकरण केले जाऊ नये.
- अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे (माजी अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती)

सगळ्याच देवता आदिमायेचे रूप
देवीचे खरे नाव अंबाबाई. आम्ही ‘अंबाबाई’ म्हणूनच संबोधतो. कालानुरूप व कार्यानुरूप आदिमायेने २१ प्रकारची रूपे घेतल्याचा उल्लेख ‘सप्तशती’त आहे. काही रूपे सौम्य व काही उग्र आहेत. देवीचे कोल्हापुरातील रूप सौम्य आहे, तर देवी तुळजाभवानी उग्र स्वरूपाची आहे. देवीने घेतलेल्या २१ रूपांतील पहिले रूप लक्ष्मीचे. सगळ्याच देवता या आदिमायेचे रूप असल्याने हा वाद उत्पन्न होऊ नये.
- विद्यानृसिंह भारती (शंकराचार्य, करवीर पीठ)
शालूचा स्वीकार मातृभावनेतून
मी देवस्थानच्या सचिवपदाचा कार्यभार घेतल्यापासून म्हणजे गेल्या दोन वर्षांत आम्ही कुठेही श्री महालक्ष्मी देवीचा ‘पत्नी’ असा उल्लेख केलेला नाही. देवीचा इतिहास पुन्हा प्रकाशित झाला. या मंदिराचा आणि कोल्हापूरचा विकास स्वतंत्र शक्तिपीठ म्हणून करण्याचाच आमचा प्रयत्न असेल. यापुढे शालूचा स्वीकार मातृभावनेतून केला जाईल.
- संजय पवार (सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती)

अशीही एक आठवण
ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब शिंदे यांनी या घटनेची एक आठवण सांगितली. त्यावेळी देवस्थान समितीचे खजानीस डफळे हे तिरूपतीहून साडी घेऊन आल्यानंतर बैठक ठेवण्यात आली होती. यावेळी डफळे यांनी अंबाबाईला पत्नी म्हणून तिरूपती देवस्थानने ही साडी दिल्याचे सांगताच डी. डी. शिंदे सरकार उठले आणि म्हणाले, ‘काय विष्णुपत्नी म्हणतोयंस? आई म्हणून कोण साडी देऊ शकत नाही का?’

करवीर पीठाने मरगळ झटकावी
देवी महालक्ष्मी ही बालाजीची पत्नी नाही, हे अभ्यासपूर्णरीत्या मांडलेल्या मालिकेतून सिद्ध होते. वास्तविक त्यासाठी करवीर पीठाने ही मरगळ झटकून टाकायला हवी होती; पण आजअखेर कोणीच असा प्रयत्न केला नाही, पण करवीरची जनता ‘लोकमत’ची ऋणी राहील.
- उमा ढोबळे (प्रतिभानगर)
दिशादर्शकावर ‘अंबाबाई’ असा उल्लेख करा
‘करवीर माहात्म्य’ ज्यांनी लिहिले, त्या ग. गो. पतकी यांचा मी वंशज. या देवीचे खरे स्वरूप ‘अंबाबाई’ असे आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी लागलेले डिजिटल, दिशादर्शक फलक किंवा बोर्ड यांवर ‘महालक्ष्मी’ ऐवजी ‘अंबाबाई मंदिर’ असा उल्लेख केला गेला पाहिजे.
- रामेश्वर पतकी

तिरूपती देवस्थानला कळविणार
मी श्रीशैलला गेलो होतो. तेथे सर्व शक्तिपीठांची माहिती व फोटो लावण्यात आले आहेत. या ठिकाणीही कोल्हापूरच्या अंबाबाईचे शक्तिपीठांत पाचव्या क्रमांकावर स्थान आहे. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या मालिकेचे सर्व भाग मी काढून ठेवले असून, तिरूपती देवस्थानाला व तेथील अधिकाऱ्यांना या सगळ्या इतिहासाची माहिती देण्यात येईल. - रामाराव (समन्वयक, तिरूपती देवस्थान)

मूर्ती हाच खरा पुरावा
महालक्ष्मी कमळात असते. तिच्या हातून धनाचा वर्षाव होतो. पार्वतीचे वाहन नंदी आहे. तिच्या हातात त्रिशूळ असतो. महाकाली तमोगुणी देवता असल्याने उग्र स्वरूपाची असते. सरस्वती सत्त्वगुणी. मात्र, या सर्व देवतांपैकी एकाही देवतेच्या मूर्तीच्या वर्णनानुसार महालक्ष्मीची मूर्ती नाही. ही देवी अन्य कोणत्याही देवतेचे रूप नाही, तर ती जगत्जननी महालक्ष्मी आहे. अशी मूर्ती फक्त कोल्हापुरातच घडविली जावी, असा नियम हेमाद्रीने लिहिलेल्या ग्रंथात आहे.
- उमाकांत राणिंगा (मूर्ती अभ्यासक)

विकास कोणत्या अर्थाने?
काहीजण या देवतेला विष्णुपत्नी, तर काहीजण पार्वती म्हणतात. मूर्र्तिवर्णनानुसार ही देवी विष्णुपत्नी नसावी; कारण देवीचा मत्स्यकंद व पद्मपुराणात उल्लेख असून, या क्षेत्राला ‘औटपीठ’ असेही म्हणतात. मंदिराचा तिरूपतीच्या धर्तीवर विकास व्हावा, यामागील उद्देश असा की, तेथे गेल्यानंतर भक्तांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा, स्वच्छता, प्रसादाची गुणवत्ता अशा चांगल्या सुविधा येथेही भाविकांनाही मिळाव्यात.
- राजू मेवेकरी
(अध्यक्ष महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट)

विकास कोणत्या अर्थाने?
काहीजण या देवतेला विष्णुपत्नी, तर काहीजण पार्वती म्हणतात. मूर्र्तिवर्णनानुसार ही देवी विष्णुपत्नी नसावी; कारण देवीचा मत्स्यकंद व पद्मपुराणात उल्लेख असून, या क्षेत्राला ‘औटपीठ’ असेही म्हणतात. मंदिराचा तिरूपतीच्या धर्तीवर विकास व्हावा, यामागील उद्देश असा की, तेथे गेल्यानंतर भक्तांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा, स्वच्छता, प्रसादाची गुणवत्ता अशा चांगल्या सुविधा येथेही भाविकांनाही मिळाव्यात.
- राजू मेवेकरी
(अध्यक्ष महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट)
देवतांचे मूळ स्थान
महालक्ष्मी मंदिराचा इतिहास जाणून घेण्याच्या उद्देशाने गेली कित्येक वर्षे मी याचा अभ्यास करीत आहे. तिरूपती देवस्थानच्या ‘वेंकटाचल माहात्म्या’मध्ये विष्णूने पत्नीच्या प्राप्तीसाठी महालक्ष्मीची तपश्चर्या केली व महालक्ष्मीमुळे लक्ष्मी-विष्णूची भेट झाली, असा उल्लेख आहे. ही देवता शिव-शक्ती, लक्ष्मी-विष्णू, ब्रह्मा-सरस्वती अशा सर्व देवतांची माता आहे. ही आद्य श्री महालक्ष्मी असून, हिच्या ठायी श्री लक्ष्मी व शिवसती यांचे दिव्य अंश विलसत आहेत.
- वेदमूर्ती सुहास जोशी

Web Title: Devotional worship superfluous --- Mahalaxmi - history can change! Part - 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.