Join us  

अंगारकी चतुर्थीला भाविकांना घेता येणार नाही सिद्धीविनायकाचे दर्शन, समितीचा महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 2:22 PM

siddhivinayak temple in mumbai : आगामी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांसाठी सिद्धिविनायक गणपतीचे ऑफलाइन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता भाविकांच्या दर्शनावर निर्बंध आणले आहेत.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या (Siddhivinayak temple) न्यास समितीने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त (Angaraki Chaturthi) भाविकांसाठी सिद्धिविनायक गणपतीचे ऑफलाइन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (siddhivinayak temple in mumbai stops offline darshan for devotees on the coming angaraki chaturthi)   

2 मार्च रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. यादिवशी कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता भाविकांच्या दर्शनावर निर्बंध आणले आहेत. ज्यांना दर्शनाची परवानगी आहे, त्यांना देखील सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यानच दर्शन घेता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अशा भाविकांनाच प्रवेश असणार आहे, ज्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे. तसेच, ज्यांच्याकडे या रजिस्ट्रेशनचा क्यूआर कोड (QR Code) आहे. तसेच, हे क्यआर कोड अहस्तांतरणीय असून व्हॉट्सअॅपद्वारे, फोटोकॉपी आणि स्क्रीनशॉटद्वारे क्यूआर कोडची प्रत स्वीकारली जाणार नाही.

दरम्यान,  राज्यात समोर येणारी कोरोनाची आकडेवारी पुन्हा एकदा भीतीदायक स्वरुप घेऊ लागली आहे. रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढू लागली आहे. परिणामी, लॉकडाऊन संपल्यानंतर सुरू करण्यात आलेली सार्वजनिक ठिकाणं पुन्हा एकदा बंद होणार की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मंदिरांमध्ये सुद्धा पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे या नियमांचे पालन करणे बंधणकारक करण्यात आले आहे.

संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे आगळे वेगळे महत्त्व आहे.- मुलांच्या प्रगतीसाठी, दीर्घायुष्यासाठी अनेक पालक संकष्टीचे व्रत करतात. एवढेच काय, तर खुद्द यशोदा मय्याने कृष्णाच्या खोड्या कमी व्हाव्यात म्हणून संकष्टीचे व्रत केले होते.- गणपती हा मंगलमूर्ती आहे. म्हणून त्याची उपासना करणाऱ्या व्यक्तीचे अमंगल होत नाही, अशी धारणा आहे. - भावभक्तीने हे व्रत केल्यामुळे ग्रहदशा सुधारते व अनिष्ट ग्रहस्थिती असल्यास बाप्पाच्या कृपाशिर्वादाचे पाठबळ मिळते.- संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यामुळे घरात मंगलमय वातावरण राहते. तसेच मंगल कार्यांना गती मिळते. 

    टॅग्स :सिद्धिविनायक गणपती मंदिरमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईगणपती