इको फ्रेंडली मूर्तींना भक्तांची पसंती

By Admin | Updated: September 8, 2015 00:12 IST2015-09-08T00:12:52+5:302015-09-08T00:12:52+5:30

गणेशोत्सव तोंडावर आल्याने भाविकांनी शहरातील गणेश कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गतवर्षीप्रमाणे यंदाही जय मल्हार, लालबागचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज, दगडूशेठ

Devotees of eco-friendly idols | इको फ्रेंडली मूर्तींना भक्तांची पसंती

इको फ्रेंडली मूर्तींना भक्तांची पसंती

नवी मुंबई : गणेशोत्सव तोंडावर आल्याने भाविकांनी शहरातील गणेश कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गतवर्षीप्रमाणे यंदाही जय मल्हार, लालबागचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज, दगडूशेठ, श्रीकृष्णाच्या तसेच विठ्ठलाच्या अवतारातील गणेशमूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शाडूपासून बनविलेल्या मूर्ती तसेच कागदापासून तयार केलेल्या बाप्पाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने इको फ्रेंडली मूर्तींची मागणी १० टक्क्यांनी वाढली आहे, अशी माहिती मूर्तिकारांनी दिली.
गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर होणारे पाण्याचे प्रदूषण, पर्यावरणाची हानी याबाबत अनेक सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी जनजागृती करत आहेत. शहरात होणाऱ्या जनजागृतीच्या माध्यमातून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी इको फ्रेंडली मूर्तीचा वापर करावा, असे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे. विसर्जनाच्या वेळी मूर्तीच्या अंगावरील दागिने, निर्माल्य अशा पाणी दूषित करणाऱ्या सर्वच वस्तू वेगळ्या काढून फक्त मूर्तीचे विसर्जन करावे अशी माहिती मूर्तिकारही भक्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत. यावर्षी चमकीच्या मूर्ती खरेदी करण्याचा भाविकांचा कल कमी होताना दिसून येतो, असे मूर्तिकारांनी सांगितले आहे.
वाशी येथील रघुलीला मॉल, इनॉर्बिटसारख्या शॉपिंग मॉलमध्येही इको फ्रेंडली गणेशमूर्तींना प्राधान्य दिले आहे. गणेशमूर्ती खरेदी करण्याबरोबरच बाप्पाचे दागिने, मुकुट, वस्त्र खरेदीकरिताही बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली आहे. बाप्पाची आरासही इको फ्रेंडली पध्दतीने सजविण्याचा आग्रह भक्तांनी धरल्याने सहजगत्या विघटन होणाऱ्या वस्तू बाजारपेठेत उपलब्ध आहेत. यामध्ये कागदापासून तसेच फुलांपासून तयार केलेल्या आरासांचा समावेश आहे. अनेक शाळांमध्ये इको फ्रेंडली गणेशमूर्तीसाठी कार्यशाळांचे आयोजन केले आहे.

Web Title: Devotees of eco-friendly idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.