देवनार डम्पिंग ग्राउंड बंद करणार!
By Admin | Updated: February 17, 2017 02:30 IST2017-02-17T02:30:07+5:302017-02-17T02:30:07+5:30
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३६मधून रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून देवनार डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे

देवनार डम्पिंग ग्राउंड बंद करणार!
अक्षय चोरगे / मुंबई
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३६मधून रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून देवनार डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे एकमुखी आश्वासन दिले जात आहे. मात्र २०१२ सालच्या निवडणुकीतही याच आश्वासनावर उमेदवारांनी मते मिळवल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे नव्या बाटलीत जुनी दारू भरल्याप्रमाणे उमेदवार नवे असले, तरी आश्वासने जुनीच असल्याचे मतदार सांगत आहेत.
विभागामध्ये दर्जेदार महाविद्यालय बांधू, मैदाने बनवू, रस्ते आणि वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवू अशी नेहमीचीच आश्वासने उमेदवारांनी जाहीरनाम्यात दिली आहेत. गतनिवडणुकीत समाजवादी पार्टीचे उमेदवार रईस कासम शेख यांनी याच आश्वासनांवर निवडणूक जिंकली होती. मात्र त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने पुन्हा तीच आश्वासने दिली जात असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. हास्यास्पद बाब म्हणजे सपाच्या नव्या उमेदवार जुन्याच आश्वासनांवर मते मागत असल्याचे दिसले.
डम्पिंग ग्राउंड बंद करणे ही लहान गोष्ट नसून त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत असल्याचे स्पष्टीकरण सपाने दिले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नगरसेवकांनी केलेले प्रयत्न अपुरे पडल्याची कबुलीही सपाने दिली आहे; शिवाय भविष्यात डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही सपाने दिला आहे. त्यामुळे यंदा निवडून आल्यावर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देणाऱ्या सपावर मतदारांनी कितपत विश्वास ठेवावा, हा प्रश्नच आहे.
याउलट डम्पिंग ग्राउंडचे कंत्राट सपाच्या आमदाराकडे असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शिवाय कंत्राटाचा मलिदा खाण्यासाठी सपा हे डम्पिंग ग्राउंड कधीही बंद करणार नाही, असा टोलाही काँग्रेसने लगावला आहे.