Join us  

समृद्धी महामार्गावर अपघात, फडणवीसांकडून शोक; मृतांच्या वारसांना आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 10:45 AM

समृद्धी महामार्गावर जांबरगाव टोलनाक्यासमोर पहाटे दीड वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली.

वैजापूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा वैजापूर येथे दोन वाहनांच्या धडकेत १२ जण ठार तर १८ जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातातील जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून शासनाने तातडीने अपघाताची दखल घेत मदतीसाठी यंत्रणा उभी केल्याचं सांगण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन अपघातातील मृतांच्या कुटुंबाबद्दल सहवेदना व्यक्त केल्या. तसेच, अपघाताबद्दलची अपडेट माहितीही दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर जांबरगाव टोलनाक्यासमोर पहाटे दीड वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे १२ जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत हे नाशिक शहरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. टेम्पो ट्रॅव्हलरमधील सर्व प्रवासी सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेले होते, असे सांगण्यात आले. शनिवारी ते पुन्हा नाशिकला परतत होते. वाटेत वैजापूर तालुक्यातील जांबरगावजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगातील टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली. या घटनेत ट्रॅव्हलरमध्ये बसलेले १८ जण गंभीर जखमी झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती देत मृतांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरनजीक एक खाजगी वाहन, ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. २० जखमींपैकी १४ जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी स्वतः तेथे पोहोचले आहेत. ६ जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही फडणवीसांनी ट्विटरवरुन दिली. 

दरम्यान, अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना वैजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

 

टॅग्स :अपघातदेवेंद्र फडणवीसवैजापूर