Join us  

महाराष्ट्र निवडणूक 2019: देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 2:53 PM

देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे.

मुंबईः देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव सादर केला. त्याला राधाकृष्ण विखे-पाटील, हरिभाऊ बागडे, सुधीर मुनगंटीवार, शिवेंद्रराजे भोसले, देवयानी फरांदे, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशीष शेलार, संजय कुटे, गणेश नाईक यांनी अनुमोदन दिलं आहे. त्यानंतर एकमतानं त्यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवारांसह जवळपास 11 आमदारांनी फडणवीसांची विधिमंडळ नेतेपदी निवड होण्यासाठी अनुमोदन दिलं असून, फडणवीसांची नेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे भाजपाकडून देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाजपा आमदार आणि नेत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. महायुतीचंच सरकार स्थापन होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी राज्य करू, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पुढची पाच वर्षं सरकार स्थिर राहणार आहे. प्रत्येक समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या 5 वर्षांपेक्षा आता जास्त चांगलं काम करायचं आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे. संविधानाच्या अनुरूप राज्य चालवायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

या बैठकीला भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, नरेंद्रसिंह तोमर आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश खन्ना उपस्थित आहेत. या बैठकीत नव्याने निवडून आलेल्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. भाजपची ही बैठक केवळ औपचारिकता म्हणून घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच विधिमंडळ नेतेपदी पुन्हा एकदा निवड होण्याचं निश्चित होतं. आजची ही बैठक भाजपानं सत्तास्थापनेसाठी पहिलं पाऊल उचलल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  दरम्यान, संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, या बैठकीत राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेत्याची निवड होणार आहे. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून, बैठकीत विधिमंडळ नेत्याची निवड करण्याचे सर्व अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवले जाणार आहेत. त्यानंतर शरद पवार विधिमंडळ नेत्याच्या नावाची घोषणा करतील. विरोधी पक्षनेता पदासाठी राष्ट्रवादीमध्ये धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांचं नाव चर्चेत आहे. तर विधीमंडळ नेतेपदासाठी अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांची नावं आघाडीवर आहेत.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019