Join us  

'महाराष्ट्रातील तरुणांना अंडरइस्टीमेट करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 3:10 PM

जबाबदार विरोधी पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपा संकट काळात सरकारच्या बाजूनं उभी राहील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून यंत्रणेचं आणि त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला

मुंबई - कोरोना संकटात केंद्राकडून राज्य सरकारला भरीव मदत मिळाली. मात्र, तरीही राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या आरोपांना महाविकास आघाडी सरकारनं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस आणि मोदी सरकारचा समाचार घेतला. यावेळी, महाराष्ट्रातील तरुणांकडे काम करण्याचे स्कील नसल्याच्या वक्तव्यावरुनही जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.  

जबाबदार विरोधी पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपा संकट काळात सरकारच्या बाजूनं उभी राहील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून यंत्रणेचं आणि त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी केली. मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या तिकिटाचा खर्च मुख्यमंत्री निधीतून केला जात आहे. मुख्यमंत्री निधीला फडणवीस यांच्या भाजपानं एका पैशाची मदत केलेली नाही. त्याऐवजी ते पीएम केअर्सला मदत करण्याचं आवाहन करत होते. त्यामुळे भाजपा महाराष्ट्राचा शत्रू आहे की मित्र असा प्रश्न निर्माण होतो. फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी केलेली ही कृती महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात राहील, असं पाटील म्हणाले.

उत्तर भारतीय मजूर त्यांच्या गावी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व व्यवहार पूर्वपदावर वेळ लागेल. कारण, महाराष्ट्रातील तरुणांकडे कंपनीत काम करण्याचं, रोजगाराचं ते स्कील नाही, असं देवेंद्र फडणवीस काल बोलून गेले. पण, फडणवीस यांचं विधान म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील तरुणांना अंडरइस्टीमेट करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय, असा आरोपही पाटील यांनी केला. राज्यातल्या तरुणांमध्ये आवश्यक कौशल्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्किल इंडिया योजना आणली होती. त्याचा पाच वर्षात काहीच उपयोग झाला नाही? स्थानिक तरुणांमध्ये स्किल नाही, असं फडणवीस यांना म्हणायचं आहे का? मोदींच्या स्किल इंडियावर त्यांना भरवसा नाही का?, असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले.

दरम्यान, देशात सर्वात उत्तम काम मुंबईत झालंय. केंद्र सरकारचं पथक सांगत होतं की, मुंबईत एप्रिलपर्यंत १.५ लाख कोरोनाचे रुग्ण आढळतील. मात्र, एप्रिलअखेर १० हजार रुग्ण होते. मे अखेरपर्यंत राज्यात १.५ लाख रुग्ण होतील, असाही अंदाज केंद्राचे पथकाने वर्तवला होता. मात्र, राज्यात मे अखेपर्यंत जवळपास ६० हजार रुग्ण होतील. राज्य सरकारने केलेल्या तत्पर कामामुळेच हे शक्य झाल्याचंही जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसजयंत पाटीलकोरोना वायरस बातम्याकेंद्र सरकार