Join us  

Devendra Fadanvis: "अर्रे, कुणाच्या बापाची औकात आहे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची", फडवीसांचं शिवसेनेला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 11:33 PM

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची असल्याचं 1 मे च्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याचं उद्धव ठाकरेंनी बीकेसीच्या सभेत बोलताना सांगितलं.

मुंबई - मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील सभेत भाजपवर शरसंधान साधले. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दात टिका केली. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस यांच्या गोरेगावच्या नेस्को येथील सेंटरमध्ये होत असेल्या सभेकडे राज्याचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांची सभा ही लाफ्टर सभा, लाफ्टर सभा, लाफ्टर सभा होती, असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या सभेची खिल्ली उडवली. तसेच, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची कुणाच्या बापाची औकात नसल्याचंही ते म्हणाले. 

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची असल्याचं 1 मे च्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याचं उद्धव ठाकरेंनी बीकेसीच्या सभेत बोलताना सांगितलं. त्यावरुन, फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, कोणाच्या बापाची औकात नाही, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची, असेही ते म्हणाले. यांच्याकडे काही मुद्दा नसला की लगेच मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायचा डाव आहे, हे पाठच केलंय. अरे, ''कुणाच्या बापाची औकात आहे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची'', असे म्हणत फडणवीसांनी शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरेंना स्पष्टच शब्दात सांगितलं. 

संयुक्त महराष्ट्राच्या चळवळीतील एक घटक हा जनसंघ होता. तुमचा पक्ष पैदाही झाला नव्हता. त्यावेळी, संयुक्त महाराष्ट्र समिती आणि जनसंघाच्या तिकिटावर उत्तमराव नाना पाटील आणि प्रेमजी भाई आचर निवडून आले होते. काहीही मनात येईल ते बोलून टाकायचं अन् जेव्हा मनात येईल तेव्हा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायचीच, असं म्हणायचं. होय, मुंबई वेगळी करायची आहे, पण महाराष्ट्रापासून नाही. तुमच्या भ्रष्ट्राचारापासून, अनाचारापासून, दुराचारापासून, अत्याचारापासून आम्हाला मुंबई वेगळी करायची आहे. याच महाराष्ट्राला भूषण वाटेल, अशी मुंबई आम्हाला निर्माण करायची आहे, असे म्हणत मुंबई महाराष्ट्राचीच असल्याचं फडणवीसांनी ठणकावून सांगितलं.  

कोविड काळात सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार 

सभेसाठी जमलेल्या लोकांना उद्देशून का हालचाल बा... सब ठिक बा.. असे म्हणत फडणवीसांनी हिंदी भाषेत भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, दाऊदशी संबंध, कोविडमधील भ्रष्टाचार, मनसुख हिरेनप्रकरणावरु राज्य सरकारवर टिका केली. गेल्या 2.5 वर्षात या महाशयांनी राज्याच्या विकासासंदर्भात एकही भाषण दिलं नाही. हनुमान चालिसेतील दोनच ओळी या सरकारला माहिती आहेत. त्यातूनच, यशवंत जाधवांनी 5 पट संपत्ती जमा केली अन् मातोश्रींना 50 लाखांचं घड्याळ भेट दिलं, असे म्हणत शिवसेनेवर टिका केली. 

नगरसेवक देवेंद्र बाबरी पाडायला गेला होता

तुझ को मिर्ची लगी तो मै क्या करू, असे म्हणत फडणवीसांनी बाबरी मशिद पाडायला गेलेल्या टिकेवरुन उद्धव ठाकरेंवर प्रतिहल्ला केला. नगरसेवक देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता. लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे, असे म्हणत आम्ही अयोध्येला गेलो होतो. मी तुरुंगातही गेलो होतो, कारसेवेला गेलो तेव्हा हा फडणवीस तुरुंगात होता. आम्ही फाईव्ह स्टार राजकारण केलं नाही, आम्ही मंदिरात झोपलो, प्लॅटफॉर्मवर झोपलो, फुटपाथवर झोपलो, तिकीट काढायलाही पैसे नव्हते, असे म्हणत फडणवीसांनी बाबरीचा त्यांचा प्रवास सांगितला. 

तेव्हा 128 किलो वजन होतं

बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतो, आता माझं वजन 102 किलो आहे. आता, हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलं. 

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसशिवसेनामुंबई