मुंबई - देशातील पाच राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीनंतर निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणीपूरमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर गोव्यामध्ये त्रिशंकू निकालाचे दावे करण्यात येत असताना तिथे भाजपाने स्पष्ट बहुमतापर्यंत मजल मारली. भाजपाने एकूण २० जागा जिंकल्या आहेत. भाजपने विजयी चौकार मारल्यानंतर देशभरातून भाजप कार्यकर्त्यांनी अभिनंदन आणि आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. आता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही उशिरा ट्विट करुन भाजपच्या विजयाबद्दल सर्वांचं अभिनंदन केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या बड्या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं आहे. तसेच, मोदींच्या नेतृत्वाला आपला सॅल्यूट असेही त्यांनी म्हटलं. भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. त्यांच्या सर्वोच्च योगदानाला, निस्वार्थ सेवेला, लोकभावनेला, गरिबांच्या कल्याणाकारी धोरणाला आणि राष्ट्रप्रथम या धोरणाला आम्ही सॅल्यूट करतो. भाजपने 4 राज्यात विजय मिळवला, त्याला मोदींमधील या गोष्टीच कारणीभूत आहेत. म्हणून, आमच्या महान नेत्याला आम्ही सॅल्यूट करतो, असे फडणवीस यांनी ट्विट करुन म्हटले आहे.
गोव्यात भाजपला आमदारांचा पाठिंबा
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही गोव्यात २० जागा जिंकल्या आहेत. तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आम्हाला पाठिंब्याचे पत्र दिले आहे. तसेच तीन अपक्ष आमदारांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता आमच्याकडे २०+३+२ असा एकूण २५ आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच अजून काही आमदार आम्हाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात बहुमतासह सरकार स्थापन करणार आहोत.