विकासकामे आजही दुर्लक्षित
By Admin | Updated: January 14, 2015 23:20 IST2015-01-14T23:20:37+5:302015-01-14T23:20:37+5:30
महानगरपालिकेचा हा प्रभाग आगाशी, उंबरगोठणदरम्यान असून या परिसरातील ग्रामस्थांनी २००९ मध्ये महानगरपालिकेच्या आगमनाविरोधात आंदोलन केले होते

विकासकामे आजही दुर्लक्षित
वसई : महानगरपालिकेचा हा प्रभाग आगाशी, उंबरगोठणदरम्यान असून या परिसरातील ग्रामस्थांनी २००९ मध्ये महानगरपालिकेच्या आगमनाविरोधात आंदोलन केले होते. या भागातील नागरिकांचा अजूनही आपल्या गावांचा या महानगरपालिकेत समावेश करण्यास विरोध कायम आहे. येथून निवडून आलेले जनआंदोलन समितीचे नगरसेवक रेमण्ड मेनेजीस यांचाही विरोध अद्याप मावळलेला नाही. त्यामुळे गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी प्रभागाच्या विकासकामांकडे लक्षच दिलेले नाही.
प्रभागात जी काही विकासकामे झाली, ती थेट महानगरपालिकेच्या माध्यमातून झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही प्रमाणात रस्ते व गटारांची कामे झाली, परंतु ती निकृष्ट दर्जाची असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेत गावांचा समावेश होता कामा नये, याकरिता येथे मोठे आंदोलन उभे राहिले होते.
परंतु, या गावांचा समावेश झाल्यानंतर विरोधात असलेल्या जनआंदोलन समितीने महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि त्यांचे तब्बल २३ नगरसेवक निवडून आले. परंतु ‘महानगरपालिका नको’
असे ठाम मत असणाऱ्या नगरसेवक रेमण्ड मेनेजीस यांनी मात्र आपला विरोध कायम असल्याचे सांगत प्रभागात महानगरपालिकेकडून होणाऱ्या विकासकामांत आपला सक्रीय सहभाग कधीच दाखवला नाही. या परिसरात नागरीकरणाला अद्याप वेग आला नसला तरी भविष्यात वेग येण्याची शक्यता आहे.
आतापासूनच नागरी सोयी-सुविधांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. परंतु, महानगरपालिका नकोच, असा अट्टहास असल्याने या परिसरात विकासकामे करणे अशक्य आहे. अशी महापालिका प्रशासनाची भूमिका आहे. (प्रतिनिधी)