पालिका करणार परिवहन डेपोंचा विकास

By Admin | Updated: July 15, 2014 00:52 IST2014-07-15T00:52:42+5:302014-07-15T00:52:42+5:30

शहरातील एनएमएमटी डेपोंच्या दुरवस्थेविषयी लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. याची दखल घेऊन पालिकेने डेपो व्हिजन राबविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Development of transport depots to the municipality | पालिका करणार परिवहन डेपोंचा विकास

पालिका करणार परिवहन डेपोंचा विकास

नवी मुंबई : शहरातील एनएमएमटी डेपोंच्या दुरवस्थेविषयी लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. याची दखल घेऊन पालिकेने डेपो व्हिजन राबविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
नवी मुंबई महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या बस डेपोंची सध्या दयनीय अवस्था आहे. डेपोंमध्ये असणाऱ्या असुविधांनी तेथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी बैठक व्यवस्था नाही, तर काही ठिकाणी बस थांब्याचे शेडच तुटलेले आहे. हे डेपो दुरवस्थेत असतानाही पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे लोकमतने विशेष मालिकेच्या माध्यमातून परिवहनच्या सर्वच डेपोंमधील समस्यांना वाचा फोडली होती. यावेळी परिवहन उपक्रमाने तात्काळ काही डेपोतील त्रुटींमध्ये सुधारणा केली होती. परंतु अद्यापही काही डेपोंमध्ये विविध स्वरुपाच्या समस्या दिसून येत आहेत. याविषयी प्रत्येक डेपोच्या स्थितीविषयी लोकमतने वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती.
पालिका प्रशासनाने डेपोंमधील असुविधेतून प्रवाशांची कायमची सुटका करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने पाऊल उचलले आहे. लवकरच परिवहनच्या सर्वच डेपोंचा नव्याने विकास केला जाणार असल्याचे महापौर सागर नाईक यांनी सांगितले आहे. महापालिकेच्या निधीतून डेपोंचे हे विकासकाम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात प्रवाशांना चांगले डेपो पहायला मिळतील असा विश्वासही महापौर नाईक यांनी व्यक्त केला आहे.
याकरिता परिवहन उपक्रम व प्रशासनासोबत चर्चा सुरु असून लवकरच त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले. परिवहन उपक्रमाच्या नाकर्तेपणामुळे प्रवाशांबरोबरच परिवहनच्या कर्मचाऱ्यांनाही डेपोंमध्ये काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गेली कित्येक वर्षे परिवहनकडून त्याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयाने कर्मचाऱ्यांच्या समस्या देखील सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Development of transport depots to the municipality