Join us

मुंबईतील मिठागरांचा विकास धोकादायक – संजय निरुपम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 16:51 IST

महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे.

मुंबईतील ‘ना विकास क्षेत्र’ आणि मिठागरांवर सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे उभारण्याच्या नावाखाली या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम यांनी केला. आधीच प्रदूषित महानगराच्या यादीत मुंबई चौथ्या स्थानी आहे. त्यातच राज्य सरकारच्या धोरणामुळे मुंबई आणि मुंबईकरांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे.  यासाठी नाईलाजाने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेले आहे. देवेंद्र फडणवीस हे मुंबईच्या वातावरणाची वाट लावायला निघालेले आहेत. मुख्यमंत्र्यांची सर्व धोरणे मुंबईचा नैसर्गिक समतोल बिघडवणारी आहे. ही सर्व धोरणे पूर्ण होऊ नयेत म्हणून मी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साकडे घातले आहे, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, मला मुंबई आणि मुंबईलगत असलेले मिठागरांबाबत जास्त चिंता आहे. बिल्डरांना या सरकारने हे आंदण म्हणून देण्याचे षडयंत्र रचले आहे. बिल्डरांच्या दबावाखाली मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत, असा माझा आरोप आहे. आता सर्वसामान्यांना परवडणारी घरे उभारण्यासाठी मिठागरांच्या जमिनी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ एप्रिल २०१८ रोजी केंद्र सरकारकडे केलेली आहे. ही मागणी मान्य झाल्यास मुंबईकरांना नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागणार आहे, असे मी पंतप्रधानांना निदर्शनास आणू इच्छितो. मिठागरे ही मुंबईतील शेवटच्या मोकळ्या जमिनी आहेत. मुसळधार पावसामुळे येणारा पूर ही मिठागरे थांबवू शकतात. मुख्यमंत्री या जमिनी सर्वसामान्यांना परवडणारी घरे हे 'कारण' दाखवून बिल्डरांचे भले करायला निघालेले आहेत.

संजय निरुपम पुढे म्हणाले कि मी पंतप्रधानांना आठवण करून देऊ इच्छितो कि २६ जुलै २००५ मध्ये संपूर्ण मुंबई जलमय झाली होती. मोठी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत हीच मिठागरे संरक्षण करू शकतात आणि हीच मिठागरे जर नाहीशी झाली तर भविष्यामध्ये मुंबई आणि मुंबईकरांना खूप मोठ्या नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी या विषयाकडे ताबडतोब स्वतः जातीने लक्ष घालावे, अशी मागणी निरूपम यांनी पत्रात केली आहे.

टॅग्स :मुंबईसंजय निरुपम