राजपुरीतील सनसेट पॉइंटचा विकास रखडला
By Admin | Updated: April 20, 2015 22:29 IST2015-04-20T22:29:16+5:302015-04-20T22:29:16+5:30
पर्यटनाच्यादृष्टीने विकास पावत असलेल्या मुरुडचे पर्यटनदृष्ट्या आकर्षण वाढविण्याकरिता व विकास करण्याकरिता पावले उचलली जात आहेत.

राजपुरीतील सनसेट पॉइंटचा विकास रखडला
मेघराज जाधव, मुरुड
पर्यटनाच्यादृष्टीने विकास पावत असलेल्या मुरुडचे पर्यटनदृष्ट्या आकर्षण वाढविण्याकरिता व विकास करण्याकरिता पावले उचलली जात आहेत. मात्र मुरुडच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या राजपुरीच्या सनसेट पॉइंटचे काम मात्र केवळ घोषणेतच रखडले आहे.
विकासाचा नारा देत माजी आमदार मीनाक्षी पाटील यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मुरुडच्या पर्यटन विकासाकरिता राजपुरी सनसेट पॉइंटसाठी २०११-१२ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हा नियोजन समितीतर्फे ३१ जानेवारी २०१३ च्या पत्रान्वये १ कोटी १४ लाख ४० हजारांची प्रशासकीय मान्यता मिळविली, मात्र त्यानंतर या कामाला वेग मिळण्याऐवजी पॉइंटचे काम रखडले. वनखात्याच्या नागपूर येथील मुख्यालयाकडून प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर भोपाळ येथील केंद्रीय कार्यालयाची अंतिम मंजुरी मिळणे अनिवार्य आहे. मुरुड सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता डी. एन. मदने यांनी आमदारांच्या मार्गदर्शनाखाली सतत दोन वर्षे पाठपुरावा केला. तथापि वनविभागाकडून या प्रस्तावित कामाला हिरवा कंदील मिळालेला नाही.
प्रस्तावित सनसेट पॉइंटसाठी फक्त ४५ गुंठे जमिनीची आवश्यकता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यकारी अभियंता (महाड) आर. एम. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ते चारवेळा तत्कालीन जिल्हाधिकारी होनाजी जावळे यांच्यामार्फत या कामासाठी मुख्य वन संरक्षक व मुख्य वन्यजीव संरक्षकांकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावाही केला. वनविभागाच्या कायद्यान्वये फणसाड अभयारण्य वनक्षेत्रामध्ये १० किमी अंतरावरील भूसंपादन करावयाचे असल्यास परवानगी अनिवार्य असल्याने या कामाला अडथळा होत आहे. ४५ गुुंठे जमीन वनखात्याकडून हस्तांतरित करावयाची असून त्यासाठी २७ लाख रुपये तर वृक्षलागवडीचे ९ लाख रुपये, याखेरीज प्रस्तावित कामाच्या किंमतीवर दोन टक्के रक्कम मिळून ३८ लाख रुपये वन्यजीव संरक्षकांकडे जमा करावयाचे आहेत. त्यास केंद्रीय कार्यालयाची अंतिम मंजुरी अद्याप मिळालेली नाही.