सात आदिवासी गावांचा विकास

By Admin | Updated: May 11, 2015 01:40 IST2015-05-11T01:40:07+5:302015-05-11T01:40:07+5:30

माणसाकडे जमिनीचा एक छोटासा तुकडा असेल तर तो माणूस त्यात आपले कष्ट ओतून आपले जगणे सुसह्य करू शकतो.

Development of seven tribal villages | सात आदिवासी गावांचा विकास

सात आदिवासी गावांचा विकास

जयंत धुळप , अलिबाग
माणसाकडे जमिनीचा एक छोटासा तुकडा असेल तर तो माणूस त्यात आपले कष्ट ओतून आपले जगणे सुसह्य करू शकतो. अशा अनन्यसाधारण तत्त्वज्ञानातून घेरामाणिकगड या ऐतिहासिक किल्ल्याच्या कुशीतील जांभूळवाडी, जैतूचीवाडी, घोटे, उत्तरेश्वरवाडी, किल्ल्याची वाडी, गावडोशी आणि मोहिली इनाम या सात आदिवासी लोकवस्तीच्या गावांतील ग्रामस्थांनी ‘अपना हाथ जगन्नाथ’ या उक्तीप्रमाणे स्वयंस्फूर्तीने सर्वोदयी विकासाची कास धरली आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून या सर्व गावांना एकत्र जोडण्यासाठी दुवा ठरले ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब नेने यांच्या नेतृत्वाखालील पेण एज्युकेशन सोसायटीच्या वरसई गावातील पु. न. गोडसे विद्यामंदिर.
गोडसे विद्यामंदिर हे आदिवासी विकासाचे केंद्रबिंदू म्हणून कार्यरत असतानाच २००६ मध्ये पेण एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब नेने आणि पुण्याच्या सर्वोदय ग्राम परिवर्तन मंडळाच्या प्रमुख दीपा श्रीराम लागू यांची भेट झाली आणि आदिवासी विकासात्मक कार्यात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय दीपा लागू यांनी घेतला. या सात गावांतील सर्वाेदयी विकासाचे एक नवे पर्व स्ुारू झाले. प्रत्यक्ष गावपातळीवर पोहोचून जनजागृती करून गावाच्या विकासासाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता आपण स्वत:च सक्रिय व्हायला पाहिजे असा विचार या सर्व ग्रामस्थांमध्ये रुजवण्यात दीपा लागू, बापूसाहेब, सर्वोदय ग्राम परिवर्तन मंडळाचे येथील पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, पु. न. गोडसे विद्यामंदिरच्या अंजली जोशी, शाळेचा संपूर्ण शिक्षकवृंद, सर्वोदय ग्राम परिवर्तन मंडळाचे वेळोवेळी येणारे कार्यकर्ते यांना यश आले. समाज परिवर्तनाचे विविध उपक्रम अनेक सहकाऱ्यांच्या हातांच्या मदतीने मार्गस्थ झाले.

श्रमदानातून ५६ बंधारे
राज्य सरकारने यंदाच्या येणाऱ्या पावसाळ्यात पाणलोट क्षेत्र विकासाकरिता ‘जलयुक्त शिवार अभियान’ हाती घेतले आहे. नेमके हेच अभियान येथील जांभूळवाडी ग्रामस्थांनी गेल्या चार वर्षांपासून हाती घेऊन यशस्वी केले आहे. ओढ्याच्या प्रवाहात लहान ५६ बंधारे घालण्याचे काम ग्रामस्थांच्या मदतीने कार्यकर्त्यांनी केले. यामुळे गावच्या विहिरींचे पाणी देखील वाढले. मे अखेरपर्यंतच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ग्रामस्थांनी स्वकष्टानेच सोडवल्याचे पु. न. गोडसे विद्यामंदिरच्या अंजली जोशी यांनी सांगितले.

६० टक्के मुले आदिवासी
आदिवासी मुले शिकली तर गावाचा विकास होईल, असा विश्वास बापूसाहेबांना होता. शाळेतील ६० टक्के मुले ही आदिवासी असल्याने शाळेतील सर्व गुरुजनांना सर्वसाधारण मुलांपेक्षा येथे अधिक मेहनत या मुलांवर घ्यावी लागते. त्यांच्या कलाने शिकवावे लागते.

Web Title: Development of seven tribal villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.