विकास नियोजनात पाणी, कचऱ्यावर भर
By Admin | Updated: April 7, 2016 01:29 IST2016-04-07T01:29:00+5:302016-04-07T01:29:00+5:30
अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि कचराप्रश्न अशा दोन ज्वलंत समस्यांचा भविष्यात सामना करण्यासाठी विकास नियोजन आराखड्यात तरतूद करण्यात आली आहे़

विकास नियोजनात पाणी, कचऱ्यावर भर
मुंबई : अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि कचराप्रश्न अशा दोन ज्वलंत समस्यांचा भविष्यात सामना करण्यासाठी विकास नियोजन आराखड्यात तरतूद करण्यात आली आहे़ पुढील २० वर्षांत शहराचा विकास करताना प्रत्येक नवीन बांधकामामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, सौरऊर्जेद्वारे उष्ण पाण्याची सुविधा, सांडपाणी पुनर्प्रक्रिया आणि ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया या प्रकल्पांची तरतूद करण्यात आली.
सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांमध्ये शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे़ आराखड्याच्या प्रारूपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्यानंतर सुधारित आराखडा तयार करून पालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे़ यामधील विकास नियंत्रण नियमावलीचा भाग ९, ११ व १२ प्रकाशित करण्यात आला असून यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत़
या तीन भागांमध्ये अग्निसुरक्षा, इमारतींची स्थैर्यता आणि सुविधा यांचा समावेश आहे़ तसेच पर्यावरणात संतुलन राखण्यावर विशेष भर देऊन जुन्या चुकांची दुरुस्ती करण्याचा पालिकेने प्रयत्न केला आहे़ यामध्ये आतापर्यंत फेल गेलेला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, सौरऊर्जेद्वारे उष्ण पाण्याची सुविधा, सांडपाण्यावर प्रक्रिया व पुनर्वापर अशा प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली. (प्रतिनिधी)