मुंबई - हक्काच्या घरासाठी दागिने मोडून पैसे गुंतवले. मात्र, घराचा ताबा मिळाला नाही. विकासकाने घर बळकावल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयीन लढा सुरू झाला. दोन महिन्यांपूर्वीच ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर राहायचे कुठे? असा प्रश्न सतावत असतानाच त्यांनी थेट हक्काच्या घराचा ताबा घेण्याचे ठरवले. कुटुंब व इतर सदस्यांसह सोसायटी गाठली. घरात जाण्यापूर्वीच प्राण सोडल्याची घटना मुलुंडमध्ये घडली.
विकासकाविरुद्ध २५ सदस्यांचा लढायशवंत शेंगाळ हे पत्नी, आई-वडील, मुलगा आणि मुलीसोबत कामगार वसाहतीत राहत होते. हक्काच्या घरासाठी त्यांच्यासह २५ सदस्यांचा विकासकाविरुद्ध लढा सुरू आहे. सोसायटीचे सदस्य मनोहर वायळ यांनी केलेल्या आरोपानुसार, मुलुंड पूर्वेकडील नानेपाडा येथील ओमकार को. ऑप हौसिंग सोसायटीचा प्लॉट हा सोसायटीच्या मालकीचा आहे. सोसायटीकडून कॉन्ट्रॅक्टर गुरुमाऊली डेव्हलपरचे जगदीश राजे व दिलीप कुडाळकर यांना सभासदांचे फ्लॅट बांधण्याची जबाबदारी दिली होती. २०१० मध्ये करारनामा झाला. ठरल्याप्रमाणे २०१३ मध्ये घराचा ताबा मिळणार होता.
आम्ही फक्त आमचे हक्काचे मागत होतो. मात्र, पैशांअभावी आमचा आवाज फक्त दाबला जात आहे. राहायचे कुठे? पुढे कसे होणार? या विचाराने ते अस्वस्थ होते. माझ्या पतीसोबत आम्ही कुटुंब गेलो. मात्र, हक्काच्या घरात जाण्यापूर्वीच त्यांनी आमच्या डोळ्यादेखत प्राण सोडले. संबंधित कंत्राटदार विकासक माझ्या पतीच्या मृत्यूला जबाबदार आहेत. - संगीता शेंगाळ, यशवंत यांच्या पत्नी
अनेकांना बसला धक्का शेंगाळ हे मुख्य प्रवर्तक आणि ओमकार सोसायटीचे अध्यक्ष होते. या लढाईमुळे ते अस्वस्थ होते. हातातील पैसा संपला. रस्त्यावर येण्याची वेळ ओढावल्याने त्यांनी थेट आपल्या घरात जाऊ, असे सांगितले. शेंगाळ हे कुटुंबासह ओम साई सोसायटीत गेले, पण घरात जाण्यापूर्वी ते कोसळल्याने अनेकांना धक्का बसला.
प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही फ्लॅटची विक्री२०२३ मध्ये इमारत उभी राहिली. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर फसवणूक करत २५ सभासदांच्या फ्लॅटचा ताबा देण्यास नकार देत त्यावर कब्जा केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील हे ५ फ्लॅट अनधिकृतपणे विक्री करण्याचा घाट घातला. याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.