देवनारच्या धुराने कोंडला श्वास
By Admin | Updated: March 5, 2015 01:51 IST2015-03-05T01:51:01+5:302015-03-05T01:51:01+5:30
गोवंडी, मानखुर्द परिसरातील माफियाच कचऱ्याला आग लावत असून, याकडे दुर्लक्ष करीत प्रशासन लोकांच्या जिवाशी खेळ करीत आहे,

देवनारच्या धुराने कोंडला श्वास
मुंबई : देवनार डंपिंग ग्राउंडमध्ये आठवडाभर धुमसत असलेला धूर अखेर आज स्थायी समितीपर्यंत पोहोचला़ गोवंडी, मानखुर्द परिसरातील माफियाच कचऱ्याला आग लावत असून, याकडे दुर्लक्ष करीत प्रशासन लोकांच्या जिवाशी खेळ करीत आहे, असा हल्लाबोल सदस्यांनी केला़ या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत सभा तहकूब करण्यात आली़
देवनार डंपिंग ग्राउंडमध्ये २६ फेब्रुवारीपासून कचऱ्याच्या आगीने पेट घेतला आहे़ अग्निशमन दलाने पाणी मारल्यानंतरही ही आग धुमसतच आहे़ यामुळे स्थानिक रहिवासीच नव्हे, तर घाटकोपर, चेंबूर, विक्रोळी, दादर, वडाळाच्या रहिवाशांनाही त्रास जाणवू लागला आहे़ मात्र याबाबत तक्रार करूनही अधिकारी कानावर हात ठेवत आहेत़ पालिकेने अद्याप फौजदारी गुन्हाही दाखल केलेला नाही, असा आरोप समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केला़
याचे समर्थन करीत भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी सभा तहकुबीच मांडली़ गेल्या वर्षी मुलुंड डंपिंग ग्राउंडमध्ये अशीच आग लागली होती़ मात्र त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले़ गोवंडी, मानखुर्द परिसरातील दहावी व बारावीच्या मुलांना अभ्यास करणेही अवघड झाले आहे़ डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास अशा तक्रारी येऊ लागल्या आहेत, असे मोहंमद सिराज यांनी सांगितले़ अखेर याप्रकरणी सभा तहकूब करण्यात आली़ (प्रतिनिधी)
लोकांचा श्वास गुदमरतोय
सतत आगीचा धूर धुमसत असल्याचा त्रास मानखुर्द, गोवंडी, विक्रोळी, वडाळा, घाटकोपर, दादरपर्यंत जाणवू लागला आहे़ डोळ्यांची जळजळ,
डोळे लाल होणे, श्वसनाचा त्रास बळावला आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिक करीत आहेत़
प्रशासन ढिम्म
स्थानिक माफियाच ही आग लावत असून, त्याचा छडा लागणे आवश्यक आहे़ मात्र याबाबत तक्रार करूनही अद्याप फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही, अशी नाराजी समाजवादीचे शेख यांनी व्यक्त केली़