अनधिकृत जलजोडण्यांचा सुळसुळाट
By Admin | Updated: May 12, 2015 04:35 IST2015-05-12T04:35:45+5:302015-05-12T04:35:45+5:30
ज्या मुंबईकरांनी पाण्याची बिले भरलेली नाहीत अथवा थकविलेली आहेत; अशा मुंबईकरांकडून दंड वसूल करण्यात महापालिका प्रशासन

अनधिकृत जलजोडण्यांचा सुळसुळाट
मुंबई : ज्या मुंबईकरांनी पाण्याची बिले भरलेली नाहीत अथवा थकविलेली आहेत; अशा मुंबईकरांकडून दंड वसूल करण्यात महापालिका प्रशासन अग्रेसर असतानाच पूर्व उपनगरातील कुर्ल्यात अनधिकृत जलजोडण्यांचा सुळसुळाट झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे याबाबत ‘एल’ विभागासह वरळी येथील जल अभियंता विभागाकडे वारंवार तक्रार करूनदेखील काहीच कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
कुर्ला पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणावर झोपड्या असून, येथे चाळींसह मोठ्या इमारतीही आहेत. शिवाय गेल्या पाच वर्षांत येथे पुनर्विकास प्रकल्पांतर्गत चाळींसह झोपड्यांच्या जागी इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र आता येथील काही झोपड्या, चाळी आणि इमारतींमधील घरांना अनधिकृतरीत्या जलजोडण्या देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते कैलाश दामुद्रे यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे मागील पाच वर्षांत अनधिकृत जलजोडण्यांचा आकडा ५ हजारांवर गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आणि या अनधिकृत जलजोडण्यांमुळे पालिकेला आजवर २० कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
अनधिकृत जलजोडण्या खंडित करण्यात याव्यात, या जलजोडण्या देण्यामागे कोणाचा हात आहे, याची चौकशी करावी आणि यावर तत्काळ उपाययोजना करावी, यासाठी एल विभाग आणि वरळी येथील जल विभागासह माजी आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडेही त्यांनी लेखी तक्रार केली होती. या तक्रारीवर एल विभागाने मागील ४ वर्षांत एकूण १ हजार ३३६ अनधिकृत जलजोडण्या खंडित करण्यात आल्याचे सांगितले. मात्र कारवाईतील हा आकडा समाधानकारक नसल्याचे दामुद्रे यांचे म्हणणे असून, उर्वरित जलजोडण्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)