नद्यांच्या स्वच्छतेसाठीचा निर्धार
By Admin | Updated: February 12, 2015 01:18 IST2015-02-12T01:18:23+5:302015-02-12T01:18:23+5:30
दहिसर, ओशिवरा, मिठी आणि पोयसर या नद्यांचे नाले झाले आहेत. नद्यांमधील जैविक विविधता नष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर नद्यांचे

नद्यांच्या स्वच्छतेसाठीचा निर्धार
मुंबई : दहिसर, ओशिवरा, मिठी आणि पोयसर या नद्यांचे नाले झाले आहेत. नद्यांमधील जैविक विविधता नष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर नद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी रिव्हर मार्चच्या वतीने ‘नद्या वाचवा’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. नद्यांची जैविक विविधता टिकविण्यासह त्यांचे पुनर्वसन या मोहिमेंतर्गत करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात दहिसर नदीच्या स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे.
४० वर्षांपूर्वी दहिसर, ओशिवरा, मिठी आणि पोयसर नदीचे पाणी दूषित नव्हते. नद्यांमध्ये उद्योगधंद्यांचे रसायनमिश्रित पाणी सोडले जात नव्हते. त्यामुळे नद्यांमधील जैविक विविधता टिकून होती. पाण्याला प्रवाह होता.
पाणी वाहते होते. नद्यांमध्ये डबकी तयार झाली नव्हती. शिवाय नद्यांमध्ये जैविक विविधता होती. त्यामुळे नदीलगत पक्षी आणि पाण्यात जलचर टिकून होते. आज नद्यांचे नाले झाले आहेत. नद्यांमध्ये दूषित पाणी सोडले जात आहे. परिणामी जैविक विविधता नष्ट झाली आहे. नदीकिनारी अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. समुद्राला मिळणाऱ्या नद्या दूषित झाल्याने तिवरांना हानी पोहोचली आहे. तिवरांची कत्तल झाली आहे. परिणामी पुराचा धोका वाढला आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली असून, समुद्राचे पाणी शहरात प्रवेश करीत आहे.
शिवाय ७० टक्के तिवरांचे जंगल नष्ट झाल्याने पर्यावरणाला हानी पोहोचली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राची पातळी वाढली असून, वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार, वाढत्या समुद्राच्या पातळीमुळे जी शहरे पाण्याखाली जातील; त्या शहरांत मुंबईचा समावेश आहे. समुद्राची पातळी वाढल्याने भरतीदरम्यान समुद्रात सोडले जाणारे दूषित पाणी मुखाद्वारे पुन्हा शहरात आत फेकले जात असून, दिवसेंदिवस पर्यावरणाचा प्रश्न चिघळत चालला आहे. (प्रतिनिधी)