Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्वास गुदमरला, हॉस्पिटल हाऊसफुल्ल; धूळ, धुके, प्रदूषणाची झाली अभद्र युती

By संतोष आंधळे | Updated: December 27, 2024 06:23 IST

मुंबई : नेहमीच्या वाहतूककोंडीला सरावलेल्या मुंबईकरांची धूळ, धुके आणि प्रदूषण यांच्या अभद्र युतीमुळे श्वासकोंडी झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य ...

मुंबई : नेहमीच्या वाहतूककोंडीला सरावलेल्या मुंबईकरांची धूळ, धुके आणि प्रदूषण यांच्या अभद्र युतीमुळे श्वासकोंडी झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले असून सर्दी, खोकला, घशाचे आणि श्वसनाचे आजार बळावू लागले आहेत. प्रदूषणाची तीव्रता इतकी की हवेतील धूलिकण मुंबईकरांच्या फुप्फुसापर्यंत पोहोचले आहेत. लहान मुले आणि वृद्धांना श्वासकोंडीचा त्रास आहे. 

प्रदूषित हवेतील धूलिकण, विषाणू आणि जिवाणूंपासून अपाय होऊ नये यासाठी श्वसनमार्गात ते फिल्टर केले जातात. मात्र, मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित असेल तर श्वसनव्यवस्था किती संघर्ष करणार, प्राणवायूद्वारे अनेक गोष्टी फुप्फुसात जातात. त्यानंतर वायुकोषाद्वारे रक्तात त्याचे अभिसरण होते. यामुळे   फुप्फुसांच्या विकारांत वाढ होते. सोबत ब्रॉन्कायटिससारखे आजार बळावून काही रुग्णांना कृत्रिम प्राणवायू देण्याची वेळ येते.

सततच्या बांधकामांमुळे हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खालावली आहे. मुंबईत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यांच्यावर महापालिका आणि संबंधित यंत्रणांचे लक्ष नाही. कुणीही कशाही पद्धतीने नियम धाब्यावर बसवून कामे करत आहे. श्वसनविकाराचे रुग्ण रुग्णालयांत मोठ्या प्रमाणावर येत आहेत - डॉ. जलील पारकर, श्वसनविकार तज्ज्ञ, लीलावती 

गेल्या काही दिवसांपासून श्वसनमार्गाच्या खालच्या आणि वरच्या भागात संसर्ग झाल्याने ताप, खोकला, दमा, अस्थमा, ॲलर्जी आणि न्यूमोनियाचे रुग्ण वाढले आहेत. फुप्फुसाच्या कार्यात अडथळा आणणारा आजार (सीओपीडी) होण्याची शक्यताही असते. त्यामुळे ज्यांना श्वसनविकार आहे त्यांनी या काळात विशेष काळजी घ्यायला हवी.  ज्यांना आधीपासून श्वसनाच्या व्याधी आहेत त्यांनी मास्क लावले तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.- डॉ. रोहित हेगडे, श्वसनविकार तज्ज्ञ, जे.जे. रुग्णालय   

टॅग्स :मुंबईवायू प्रदूषणहॉस्पिटल