तोतया डॉक्टरने केली पत्नीचीही फसवणूक
By Admin | Updated: February 16, 2015 05:05 IST2015-02-16T05:05:02+5:302015-02-16T05:05:02+5:30
तोतया डॉक्टर बनून अनेकांना लाखोंंचा गंडा घालणाऱ्या सिद्धिकी मोहंमद अब्दुल या ठगाने फसवणूक करीत लग्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली

तोतया डॉक्टरने केली पत्नीचीही फसवणूक
भांडुप : तोतया डॉक्टर बनून अनेकांना लाखोंंचा गंडा घालणाऱ्या सिद्धिकी मोहंमद अब्दुल या ठगाने फसवणूक करीत लग्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आपण कार्डिओसर्जन असून, इंडियन फॉरेन आॅफिसर म्हणून काम बघत असल्याची बतावणी करीत त्याने लग्न केले होते.
दिल्लीतील टॅक्सीचालक सिद्धिकी याने एका खाजगी हॉस्पिटलचा तोतया डॉक्टर बनून अनेकांना लाखोंंचा गंडा घातला. भारतीय सैन्य दलातील निवृत्त अधिकारी काकाश्री जेकम मॅथ्यू यांच्या मुलाला सिडनी विद्यापीठातून स्कॉलरशिपचे आमिष दाखवून ४ लाख ६८ हजारांचा गंडा घातल्यानंतर हा प्रकार समोर आला.
याप्रकरणी भांडुप पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. सिद्धिकीला जवळचे नातेवाईकही नाहीत. कोणीतरी जोडीदार हवा, म्हणून त्याने ग्वाल्हेरच्या एका विधवेला आपण डॉक्टर आणि आयएएफएस अधिकारी असल्याची बतावणी करून लग्न केले.
आई-वडील आॅस्टे्रलियाला राहत असल्याचे सांगून घरमालक मिलिंद कुलकर्णी यांना ३० हजारांचा तर त्यांंचे मित्र देशपांडे यांंच्या मुलाला रेल्वेत नोकरी मिळवून देतो, असे सांगून एक लाखांचा गंडा त्याने घातला होता. या महाठगाने विमानातून दुबईकडे जाताना सहप्रवाशालाही बोलण्यात गुंतवून लाखोंंना ठगविले. दिल्लीत ज्या हॉटेलमध्ये तो थांबायचा, तेथील कर्मचाऱ्यालाही नोकरीचे आमिष दाखवून तो फसविण्याच्या प्रयत्नात होता. (प्रतिनिधी)