विहिरीला प्रदूषणाचा विळखा

By Admin | Updated: December 19, 2014 00:07 IST2014-12-19T00:07:25+5:302014-12-19T00:07:25+5:30

महाड औद्योगिक वसाहतीतून होणारी खाडी प्रदूषण समस्या वारंवार भेडसावत असताना दासगाव पोलीस चौकीलगतची विहीर अचानक केमिकलच्या पाण्यामुळे दूषित

Detection of pollution by the well | विहिरीला प्रदूषणाचा विळखा

विहिरीला प्रदूषणाचा विळखा

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीतून होणारी खाडी प्रदूषण समस्या वारंवार भेडसावत असताना दासगाव पोलीस चौकीलगतची विहीर अचानक केमिकलच्या पाण्यामुळे दूषित झाल्याने दासगांव ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या विहिरीच्या पाण्यावर जवळपास अर्धे गाव अवलंबून आहे. या विहिरीचे पाणी मे महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण गावाला पुरवठा होत असल्याने पाणी टंचाईवेळी काय करायचे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेली दासगाव नळपाणी पुरवठा योजना कधी बंद, कधी सुरू अशीच होत राहिली. यात वीज बिलांचा प्रश्न, कधी धरणाच्या पाण्याची कमतरता, तर कधी सावित्री खाडीतील दूषित उधाणाचे पाणी जॅकवेलमध्ये घुसत असते. दरवर्षी या नळपाणी पुरवठा योजनेला काही न काही अडचणी येत असतात. अशावेळी दासगाव ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी गावातील विहिरीचाच आधार असतो. दासगाव पोलीस चौकीलगत असणारी विहीर ही एकमेव अशी आहे की, संपूर्ण भोईवाडा ते नाका असा दासगावचा अर्धा भाग या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहे.
काही दिवसांपूर्वी दासगाव ग्रामपंचायतीने फलकावर नोटीसद्वारे ग्रामस्थांना नळाचे पाणी कोणीही पिण्यास किंवा जेवणास वापरू नये कारण नळाद्वारे येणारे पाणी ज्या ठिकाणाहून येते आहे त्या ठिकाणी जॅकवेलमध्ये खाडीच्या उधाणाचे केमिकलचे दूषित पाणी शिरले आहे. येणारे पाणी दूषित आहे, असे सूचित केले होते. सध्या ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी मिळत आहे, मात्र त्याचा काहीही उपयोग नाही. संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी ही पोलीस चौकीच्या विहिरीपासून जवळच आहे. या गावकीच्या पाण्याच्या टाकीत के मिकलचे दूषित पाणी येत असल्याने ते पाणी त्या टाकीतून झिरपून या विहिरीमध्ये येत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
एप्रिल महिन्यापासून दासगांवमध्ये नळाद्वारे येणारे पाणी दरवर्षी बंद होते. ज्या कोतुर्डे धरणाचे पाणी या योजनेसाठी वापरले जाते ते धरण एप्रिलमध्ये आटते. नंतरच्या काळात गावातील विहिरीवर ग्रामस्थ अवलंबून असतात. संपूर्ण दासगांव ग्रामस्थांना या विहिरीतून मुबलक पाणी मिळते. (वार्ताहर)

Web Title: Detection of pollution by the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.