हिट अ‍ॅण्ड रन खटल्याचा तपशील खाक

By Admin | Updated: May 29, 2015 01:24 IST2015-05-29T01:24:57+5:302015-05-29T01:24:57+5:30

अभिनेता सलमान खानवरील हिट अ‍ॅण्ड रन खटल्यात सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी आलेल्या खर्चाचा तपशील २०१२मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीत नष्ट झाला आहे.

Details of Hit and Run Case | हिट अ‍ॅण्ड रन खटल्याचा तपशील खाक

हिट अ‍ॅण्ड रन खटल्याचा तपशील खाक

मुंबई : अभिनेता सलमान खानवरील हिट अ‍ॅण्ड रन खटल्यात सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी आलेल्या खर्चाचा तपशील २०१२मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीत नष्ट झाला आहे.
गोरेगाव येथील वकील मन्सूर उमर दरवेश यांनी माहितीच्या अधिकारात या खर्चाचा तपशील मागितला असता गृह व कायदा व न्याय मंत्रालयाने या खर्चाशी संबंधित दप्तर (नोंदी) जून २०१२मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळाल्याचे उत्तर दिले आहे. हिट अ‍ॅण्ड रन खटल्यात सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत यांची नियुक्ती केली आहे व प्रत्येक सुनावणीला त्यांना ६ हजार रुपये दिले जातात. हिट अ‍ॅण्ड रन खटल्याची सार्वजनिक पातळीवर चर्चा व चिकित्सा होत असून, या खटल्यात किती खर्च आला याची माहिती घेण्याचा माझा प्रयत्न होता. निकाल जाहीर होताच मी तत्काळ माहितीच्या अधिकारात अर्ज केला. सरकारने अशा प्रकारच्या खटल्यावर किती खर्च केला हे माहिती असणे महत्त्वाचे आहे म्हणून मी गृह व कायदा व न्याय मंत्रालयाकडे माहितीच्या अधिकारात अर्ज केला, असे मन्सूर दरवेश यांनी सांगितले.
दरवेश यांनी आपल्या अर्जात सरकारने किती संख्येत सल्लागार, कायदेपंडित व वकील व अन्य कर्मचारी नियुक्त केले होते याची माहिती विचारली होती. या खटल्यात ६ मे २०१५ रोजी निकाल जाहीर होईपर्यंत सरकारने किती कायदा शुल्क अदा केले हेदेखील त्यात विचारले होते. गृह मंत्रालयाने त्यांच्या अर्जाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, जून २०१२मध्ये मंत्रालय इमारतीला लागलेल्या आगीत इमारत आणि या खटल्याशी संबंधित दप्तर नष्ट झाले असल्यामुळे आग लागलेल्या दिवसापर्यंतची माहिती देणे शक्य नाही. (प्रतिनिधी)

 

Web Title: Details of Hit and Run Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.