‘मन्नत’चा रॅम्प उद्ध्वस्त!
By Admin | Updated: February 15, 2015 00:58 IST2015-02-15T00:58:22+5:302015-02-15T00:58:22+5:30
मन्नत बंगल्यासमोरील बेकायदा रॅम्प तोडण्याची मुदत संपूनही बॉलीवूड किंग शाहरुख खानने कोणतेच पाऊल न उचलल्याने अखेर पालिकेनेच त्यावर हातोडा चालवला.

‘मन्नत’चा रॅम्प उद्ध्वस्त!
मुंबई : मन्नत बंगल्यासमोरील बेकायदा रॅम्प तोडण्याची मुदत संपूनही बॉलीवूड किंग शाहरुख खानने कोणतेच पाऊल न उचलल्याने अखेर पालिकेनेच त्यावर हातोडा चालवला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात शनिवारी सकाळी ७ वाजताच हा रॅम्प उखडून काढला.
वांद्रे पश्चिम बॅण्डस्टॅण्ड येथे शाहरुख खानचा प्रशस्त बंगला आहे़ त्याच्या वाहनांसाठी बंगल्याबाहेर रस्त्यावरच ९़५ मीटरचा रॅम्प बांधण्यात आलेला होता़ मात्र या रॅम्पमुळे वाहतुकीला अडथळा व गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांकडून होत होती़ या प्रकरणी खासदार पूनम महाजन यांच्या पत्रानंतर ५ फेब्रुवारी रोजी महापालिकेने शाहरुखला नोटीस पाठवली़ या नोटीसनुसार बेकायदा रॅम्प तोडण्यासाठी दिलेली मुदत गुरुवारी संपली़ मात्र नोटीसला खान कुटुंबीयांकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे पालिकेचे ३५ कर्मचारी व कामगार जेसीबीसह आज सकाळी मन्नतवर धडकले़ शाहरुखच्या बंगल्याबाहेरच ही कारवाई सुरू असल्याने बघ्यांची गर्दी जमली होती़ गर्दीमुळे बॅरिकेड्स लावण्यात आले़ त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने हा काँक्रीटचा रॅम्प तोडण्यात आला़ एच पश्चिम विभागाचे साहाय्यक आयुक्त विजय कांबळे यांनी या कारवाईस दुजोरा दिला आहे़ (प्रतिनिधी)
हा बंगला सागरी नियंत्रण क्षेत्रात येत असल्याने बांधकामावेळी या कायद्याचे उल्लंघन होणार नाही, अशी लेखी हमी शाहरुखने जिल्हाधिकारी कार्यालय (उपनगरे) यांना दिली होती़ मात्र बेकायदा रॅम्पमुळे या कायद्याचे उल्लंघन तसेच माउंट मेरी चर्चपर्यंत जाणारा तीनशे वर्षे जुना रस्ता बंद झाला होता़ यामुळे जत्रेला येणाऱ्या भाविकांचीही गैरसोय होत होती़ या प्रकरणाची दखल घेऊन महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी कार्यालयास पाहणीचे निर्देश दिल्याचे समजते़
पुरातन वास्तू असलेला हा बंगला शाहरुख खानने २००१ मध्ये एका ट्रस्टकडून खरेदी केला़ त्यानंतर या बंगल्याचे नाव ‘मन्नत’ असे ठेवण्यात आले़ या प्रशस्त बंगल्यामध्ये सर्व सुखसोयी ठेवण्यासाठी शाहरुखने करोडो रुपये खर्च केले आहेत.
रहिवाशांना दिलासा
९़५ मीटरऐवजी रॅम्प कमी करून सहा मीटर करण्याची सूचना पालिकेने केली होती़ मात्र याची दखल शाहरुखने न घेतल्यामुळे पालिकेने सहा महिन्यांपूर्वी कारवाई केली होती़ तरीही परत हा रॅम्प तयार करण्यात आला़ मात्र माउंट मेरी चर्चपर्यंत जाणाऱ्या जिन्यांचा मार्गच या रॅम्पमुळे अडविला जात होता़ त्यामुळे वाहतूक व रहदारीला अथडळा निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली होती़