निर्जन स्थळ पोलिसांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:06 IST2021-09-22T04:06:30+5:302021-09-22T04:06:30+5:30

मुंबई साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. अशात निर्जन स्थळ पोलिसांच्या रडारवर आले असून, या ...

Desolate place on police radar | निर्जन स्थळ पोलिसांच्या रडारवर

निर्जन स्थळ पोलिसांच्या रडारवर

मुंबई

साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. अशात निर्जन स्थळ पोलिसांच्या रडारवर आले असून, या भागात पोलिसांकड़ून गस्त वाढविण्यात आली आहे.

गेल्या ८ महिन्यांत मुंबईत बलात्काराच्या ६१९ गुन्हे नोंद आहेत, तर ७२३ जणींच्या अपहरणाची नोंद पोलीस दफ्तरी करण्यात आली आहे. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यात दोनशेने वाढ झाली आहे, तर विनयभंगाच्या १ हजार २६९ गुन्ह्यांची नोंद झाली असून, त्यापैकी १ हजार ५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

एनसीआरबीने गेल्या वर्षीच्या जारी केलेल्या अहवालात, देशातील १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला असून, त्यात राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांचा समावेश आहे. महिलांविरोधी गुन्ह्यात दिल्ली पहिल्या क्रमांकावर (९ हजार ७८२) तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर (४ हजार ५८३) आहे. लोकसंख्येच्या तुलनेने मुंबईचा महिलांसंबंधित गुन्हे दर ५३.८ टक्के आहे. नागपूर शहरात ९२० गुन्हे नोंद झाले आहेत, तर पुण्यात १ हजार ५५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

मुंबईतल्या काही ठिकाणी आजही रात्रीच्या सुमारास तरुणी, महिलांना एकटे जाण्यासाठी मनात धाकधूक असते. झोपडपट्टी, मनोरंजन पार्क, शाळा, कॉलेज कॅम्पस, थिएटर, मॉल्स, बाजारपेठा, बस स्टँड आणि रेल्वे स्थानकांकडे जाणारे भूमिगत पास, याशिवाय ज्या ठिकाणी लोकांची कमी वर्दळ असेल त्यांना हॉटस्पॉटमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. जर एखादी मुलगी रात्री प्रवास करत असेल आणि तिने मदत मागितली. तर, तिला सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मदत केली जाईल. पोलीस ठाण्याच्या परिसरात एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलांची गस्त घालताना भेट घेऊन तिची अडचण समजून घेतली जाणार आहे.

मदतीसाठी @१०३

कोणी छेड काढत असल्यास मुंबई पोलिसांच्या १००, १०३ या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास तत्काळ मदत मिळेल.

महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक

मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा कक्ष स्थापन केले जाणार आहेत. सोबतच निर्भया पथकांतर्गत महिला सुरक्षेचे विविध उपक्रम सुरू केले जाणार आहेत.

ही ठिकाणे धोक्याचीच

मुंबईतले मालाड लिंक रोड, विविध स्कायवॉक, सबवे, झोपडपट्टी लगत असलेले परिसर रात्रीच्या वेळेस मद्यपी, गर्दुल्यांचा अड्डा बनत असल्यामुळे अशा ठिकाणी छेडछाडी, चोरीच्या घटनांची भर पडतानाही दिसत असल्याचे काही तरुणींचे म्हणणे आहे.

पोलिसांच्या ऑल आउट ऑपरेशनची धास्ती

मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी ऑल आउट ऑपरेशनद्वारे एकाच वेळी पोलिसांकडून संपूर्ण परिसर पिंजून काढतात. नुकतेच राबविलेल्या ऑल आउट ऑपरेशनदरम्यान १३६ ठिकाणी नाकाबंदी करत आरोपींची धरपकड करण्यात आली आहे.

शहरातील महिला अत्याचाराच्या घटना

वर्ष गुन्हे उकल

२०१८ - ५९७८ ४८१५

२०१९ - ६४३८ ५३२८

२०२० - ४५३९ ३५०७

२०२१ - ३५१५ २५९३

(ऑगस्टपर्यंत)

Web Title: Desolate place on police radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.