Join us  

लोकलमध्ये अपंगांचा डबा विशेष डिझाईन करा : हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 2:46 AM

अपंगांना एक पूर्ण डबा तरी द्या किंवा त्यांच्यासाठी राखीव भाग विशेष डिझाइन करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला शुक्रवारी केली.

मुंबई : सामान्य प्रवाशांना घाईगर्दीत लोकल ट्रेनमधील अपंगांचा डबा समजत नसल्याने ते त्या डब्यात चढतात आणि अपंगांची गैरसोय होते. यावर उपाय म्हणून अपंगांना एक पूर्ण डबा तरी द्या किंवा त्यांच्यासाठी राखीव भाग विशेष डिझाइन करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला केली.अपंगांच्या डब्यात सीसीटीव्हीही नाहीत. अपंगांच्या डब्यात सामान्य प्रवासी चढल्यास त्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद कायद्यात आहे. मात्र, याबाबत प्रवाशांमध्ये जागरूकता नाही. त्यामुळे दंडाबाबतची माहिती अपंगांच्या डब्यात द्यावी, अशी विनंती नितीन गायकवाड यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.अपंगांसाठी पूर्ण डबा द्या किंवा सध्याचा डबा विशेष प्रकारे डिझाइन करा. त्याच्या रंगात बदल करून तो ठळक करा. त्यामुळे लोकांना पाहताक्षणी समजेल की, तो डबा अपंगांसाठी आहे. महिलांच्या डब्ब्यासाठीही असेच काही तरी करा. या दोन्ही डब्यांवरील झेब्रा क्रॉसिंग काढा. तसेच या दोन्ही डब्यांवरील बोधचिन्हेही मोठी करा, असे म्हणत न्यायालयाने रेल्वेला तातडीने कामाला सुरुवात करण्यास सांगितले.

टॅग्स :मुंबई हायकोर्टमुंबईलोकलपश्चिम रेल्वेरेल्वेमध्य रेल्वे