उपमहापौर बनले वाहतूक पोलीस !

By Admin | Updated: June 14, 2015 01:50 IST2015-06-14T01:50:40+5:302015-06-14T01:50:40+5:30

वाशी अग्निशमन दलाच्या चौकात दुपारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी नव्हते.

Deputy Mayor became traffic police! | उपमहापौर बनले वाहतूक पोलीस !

उपमहापौर बनले वाहतूक पोलीस !


नवी मुंबई : वाशी अग्निशमन दलाच्या चौकात दुपारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी नव्हते. वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे चक्काजाम झाले होते. बराच वेळ सुरू असलेला गोंधळ थांबविण्यासाठी चक्क उपमहापौर अविनाश लाड कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले व सर्वांना विनंती करून अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत केली.
दुपारी २ वाजण्याच्या सुमारास चौकामध्ये वाहतूक कोंडी झाली. सिग्नल बंद असल्यामुळे वाहनधारक मनाप्रमाणे गाडी पुढे घेऊन जात होते. चारही बाजूंनी वाहने चौकात आल्यामुळे अचानक चक्का जामची स्थिती निर्माण झाली. एकही गाडी पुढे सरकेना झाली. वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात हॉर्न वाजविण्यास सुरुवात केली. हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजाने पादचाऱ्यांनाही कानावर हात ठेवून जावे लागत होते. काही वाहनचालक समोरच्या वाहनावरील चालकांना शिव्या देऊन गाडी पुढे घेण्यास सांगत होते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस जागेवर नव्हते. त्यामुळे समस्या जास्तच वाढली. याविषयी माहिती याच परिसरात राहणाऱ्या उपमहापौर अविनाश लाड यांना मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन स्वत: रोडवर उतरून वाहनधारकांना समजावण्यास सुरुवात केली. त्यांचे काही कार्यकर्ते व मित्रही रोडवर उतरले. वाहनधारकांना शिस्तबद्धपणे कोठून गाडी काढायची हे समजावून सांगत होते.
चक्क उपमहापौर रोडवर उतरल्यामुळे अनेक चालकांनी बेशिस्तपणा सोडून रांगेत जाणे पसंत केले. काही दुचाकीस्वार व रिक्षाचालक मात्र तसेच पुढे जात होते. कार्यकर्त्यांनाच काहीजण उलट बोलत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. जवळपास अर्धा तास सर्व वाहतूक सुरळीत केल्यानंतर उपमहापौरही पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

Web Title: Deputy Mayor became traffic police!