Join us
Daily Top 2Weekly Top 5

उपमहासंचालकांनी माझा छळ केला, समीर वानखेडे यांची एनसीबीविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 06:08 IST

ज्ञानेश्वर सिंग यांनी आपला छळ केल्याची तक्रार एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केली आहे.

एनसीबीचे उपमहासंचालक आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांनी आपला छळ केल्याची तक्रार एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केली आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत वानखेडे यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. 

आर्यन खानला अंमली पदार्थ प्रकरणात अटक केल्यानंतर वानखेडे चर्चेत आले. त्या दरम्यान वानखेडे यांचा धर्म आणि जातीचा मुद्दाही चर्चेत आला. मात्र, जातपडताळणी समितीने वानखेडे यांना क्लिन चीट दिल्यानंतर ५ सप्टेंबरला वानखेडे यांनी ज्ञानेश्वर सिंग यांच्याविरोधात लेखी तक्रार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केली.

दरम्यान, मंगळवारी आर्यन खान प्रकरणात त्रुटी आढळल्याचा अहवाल दक्षता आयोगाने एनसीबीच्या संचालकांकडे प्रसिद्ध करत वानखेडे व त्यांच्या तत्कालीन टीममधील काही अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली, त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने तातडीने, केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव, केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष, केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाच्या दक्षता विभागाचे महासंचालक तसेच एनसीबीचे महासंचालक यांना पत्र लिहित त्यांच्यावरील कारवाईला स्थगिती देण्याचे कळविले आहे. 

सिंग यांच्यावर आरोपआयोगाकडे केलेल्या तक्रारीत  ज्ञानेश्वर सिंग यांनी काही साक्षीदारांना मारहाण करणे, वानखेडे यांच्या चौकशीची निगडीत विशिष्ट माहिती काही प्रसारमाध्यमांना देणे, वानखेडे आणि त्यांच्या कुटुबांच्या सांपत्तिक स्थितीची विशिष्ट माहिती ठरावीक माध्यमांना देणे आदी आरोप केल्याचे समजते. 

सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, या अधिकाऱ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला असून, त्याचे पुरावेदेखील मी आयोगाला दिले आहेत.समीर वानखेडे,आयआरएस अधिकारी

टॅग्स :समीर वानखेडेनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो