रायगडची ‘मेरी कोम’ सुविधांपासून वंचित
By Admin | Updated: December 14, 2014 23:09 IST2014-12-14T23:09:00+5:302014-12-14T23:09:00+5:30
मणिपूरच्या मेरी कोमला यश, प्रसिद्धी मिळाली मात्र रायगडच्या या मेरीला आता यशाची शिडी गाठण्यासाठी मदतीची, प्रोत्साहनाची गरज आहे

रायगडची ‘मेरी कोम’ सुविधांपासून वंचित
अमोल पाटील, खालापूर
कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसतानाही बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, कराटे व कुस्ती स्पर्धेत विविध पदकांची कमाई करीत खालापूर तालुक्यातील सुविधा कडव हिने खालापूरसह रायगडचे नाव राज्य व देशपातळीवर चमकावले आहे. मणिपूरच्या मेरी कोमला यश, प्रसिद्धी मिळाली मात्र रायगडच्या या मेरीला आता यशाची शिडी गाठण्यासाठी मदतीची, प्रोत्साहनाची गरज आहे. क्रिकेटवेड्या रायगडकरांसह खोपोलीकरांनी तिच्या खेळाकडे दुर्लक्ष केल्यानंतरही सुविधाची स्पर्धेतील उज्ज्वल यशोगाथा कायम आहे.
खोपोलीतील के. एम. सी. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सुविधा कडव हिला कुठल्याही प्रकारच्या खेळाचा वारसा नाही. खालापूर तालुक्यातील देवन्हावे या खोपोली-पाली रस्त्यावर असलेल्या एका गावात राहत असलेल्या सुविधाने दहावीनंतर खोपोलीतील शतोकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशन या संस्थेत कराटे शिकण्यासाठी प्रवेश घेतला आणि इथूनच सुविधाच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली. या संस्थेच्या प्रमुख शीतल गायकवाड यांना आदर्श मानत सुविधाने खेळाकडे आपले लक्ष केंद्रित केले. बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, कराटे स्पर्धेत सुविधाने राज्य स्तरावर खेळून ८ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली असून, मुंबई आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत एक रौप्य व दोन कांस्यपदकांवर आपले नाव कोरले आहे. राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी सुविधाची निवड झाली होती. परंतु जखमी असल्याने तिला खेळता आले नाही. शतोकोन या संस्थेच्या प्रमुख व के. एम. सी. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या प्रा. शीतल गायकवाड यांचे सुविधाला घडविण्यात मोठे योगदान आहे.
खोपोली नगरपालिका व अन्य ठिकाणावरून कुठलीही मदत नाही. क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याची उदासीनता व क्रिकेटचे अतिवेड यामुळे अन्य खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याचे सुविधाचे म्हणणे आहे. जिल्हा क्रीडा विभागानेही आपल्याकडे दुर्लक्ष केले असून, मुंबई आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेतील अनुभवावरून खेळातही राजकारण चालते हे दिसल्याचे सुविधाचे म्हणणे आहे. भविष्यात पोलीस खात्यात जाण्याचा मानस सुविधाने या वेळी व्यक्त केला. आपली आई तेजस्वी व वडील सुधीर कडव तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य एन.बी. पवार, महाविद्यालयाचे माजी उपाध्यक्ष मनीष यादव यांच्या पाठिंब्यामुळेच आपण क्रीडा क्षेत्रात आजवर हे यश मिळवू शकलो, असे सांगणाऱ्या रायगडच्या या मेरी कोमला मदतीसह प्रोत्साहनाची खरी गरज आहे.