Depression among Mumbaiis about living surveys | राहणीमान सर्वेक्षणाबाबत मुंबईकरांमध्ये उदासीनता

राहणीमान सर्वेक्षणाबाबत मुंबईकरांमध्ये उदासीनता

मुंबई : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या वतीने ‘राहणीमान निर्देशांक सर्वेक्षण २०१९’ अंतर्गत सर्वोत्तम शहरांचे सर्वेक्षण केले जात आहे़ मात्र दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात आतापर्यंत केवळ १४ हजार लोकांनीच आपले मत नोंदविले आहे़ यामुळे झोपेतून जागे झालेल्या महापालिकेने सर्वेक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई महापालिका या सर्वेक्षणाची नोडल एजन्सी म्हणून काम करीत आहे़ या सर्वेक्षणामध्ये आॅनलाइन प्रणालीद्वारे नागरिकांना त्यांच्या शहराबद्दलचे मत नोंदविता येणार आहे़ नागरिकांचा अभिप्राय यावर थेट मुलाखतीद्वारे घेण्यात येत आहे़ यामध्ये देशातील सर्व मोठ्या शहरांनी सहभाग घेतला आहे़ यासाठी १ फेब्रुवारीपासून आॅनलाइन मतदान सुरू झाले आहे़ परंतु आतापर्यंत मुंबईतील केवळ १४ हजार लोकांनी आपले मत नोंदविले आहे़ यामुळे महापालिकेची आता झोप उडाली असून मतदानाचा आकडा वाढण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे़

यासाठी सर्वेक्षणाची गरज
या सर्वेक्षणातून मिळणाऱ्या रेटिंगमुळे नागरिकांना काय हवे? शहरात पुरविण्यात येणाºया सुविधांबाबत काय वाटते? हे प्रशासनाला कळू शकेल़ त्यानुसार दिल्या जाणाºया सेवा व सुविधांमध्ये बदल करणे शक्य होणार आहे़ त्याचबरोबर इतर शहरांच्या तुलनेत आपल्या शहराचा दर्जा काय? हे कळून येते, असे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले़

सर्वेक्षणात काय?
या सर्वेक्षणामध्ये शिक्षण, आरोग्य, महिलांची सुरक्षा, वाहतूक सेवा, रोजगाराची संधी, घर, स्वच्छता, पाणीपुरवठा, आपत्कालीन सेवा, आर्थिक सेवा, वीजपुरवठा अशा सेवांशी निगडित २१ प्रश्न विचारण्यात आले आहेत़ यामध्ये पायाभूत सुविधांसाठी ७० गुण तर नागरिकांच्या मतांचे ३० गुण असे १०० गुण दिले जातात़ मात्र मुंबईकरांनी मतदान न केल्यास जागतिक दर्जाच्या मुंबई शहराची नाचक्की होईल, अशी भीती अधिकाऱ्यांना वाटत आहे़

महापालिकेने गेल्या काही दिवसांमध्ये १३ वृत्तपत्रे, १८ होर्डिंग्ज, चार हजार पोस्टर्स आणि सोशल मीडियावर याबाबत जनजागृती केली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे़ मात्र लोकसंख्येच्या तुलनेत नागरिकांकडून एक टक्का मतही न आल्यामुळे या जनजागृतीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे़

Web Title: Depression among Mumbaiis about living surveys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.