२९१ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
By Admin | Updated: April 25, 2015 23:59 IST2015-04-25T23:59:29+5:302015-04-25T23:59:29+5:30
महापालिकेच्या निवडणुकीत १११ प्रभागांत उभ्या असलेल्या ५६८ उमेदवारांपैकी तब्बल २९१ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
२९१ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
सूर्यकांत वाघमारे - नवी मुंबई
महापालिकेच्या निवडणुकीत १११ प्रभागांत उभ्या असलेल्या ५६८ उमेदवारांपैकी तब्बल २९१ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यात सर्वाधिक पक्षीय उमेदवार काँग्रेसचे ६६ तर भाजपाचे ७, राष्ट्रवादीचे ४ व शिवसेनेच्या २ उमेदवारांचा समावेश आहे. उर्वरित सर्व उमेदवार अपक्ष आहेत.
महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना ठरावीक रक्कम डिपॉझिट भरावी लागते. त्यानुसार नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राखीव प्रभागासाठी २ हजार ५०० रुपये तर खुल्या प्रभागासाठी ५ हजार रुपये डिपॉझिट भरून एकूण ५६८ उमेदवार रिंगणात उतरलेले. या उमेदवारांना भरलेले डिपॉझिट (सुरक्षा अनामत रक्कम) वाचवण्यासाठी झालेल्या मतदानाच्या एकतृतीयांश मते मिळवणे आवश्यक असते. मात्र २९१ मतदारांना इतकी मते न मिळाल्याने त्यांचे डिपॉझिट पालिकेला जप्त करावे लागले आहे. त्यामध्ये अपक्ष उमेदवार सर्वाधिक आहेत. तर पक्षीय उमेदवारांमध्ये डिपॉझिट जप्त करण्यात काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. काँग्रेसने ९२ जागांवर उमेदवार उभे केलेले. त्यापैकी १० जणांचा विजय झाला असून ६६ जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीनेही १०८ जागांवर उमेदवार उभे केलेले. मात्र त्यापैकी ४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याने त्या पक्षाचीही नाचक्की झाली आहे. तर लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील यशानंतर हवेत वावरणाऱ्या भाजपच्या भ्रमाचा फुगा फुटला असून त्यांचे ४३ पैकी ७ उमेदवार आपले डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत. तसेच भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेच्याही २ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले आहे. आरपीआय, शेकाप यांच्यासह इतर छोटे पक्ष देखील उमेदवारांचे डिपॉझिट वाचवू शकलेले नाहीत. अनेकांची डिपॉझिट अपक्ष उमेदवारांमध्ये झालेल्या मतांच्या विभागणीमुळे जप्त झाले आहेत. या निवडणुकीत ८ लाख १५ हजार ६७ मतदारांपैकी ३ लाख ९४ हजार मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्यापैकी १ लाख ५१ हजार ५८२ मते राष्ट्रवादीला मिळाली आहेत. तर अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादीला वरचढ ठरलेल्या शिवसेनेला १ लाख ४८३ इतकी मते मिळालेली आहेत. तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला ४२ हजार ४८४ मतांवर समाधान मानावे लागले आहे. केंद्रात सत्ता असलेल्या भाजपालाही अवघी ३९ हजार १४३ मते मिळाली आहेत. शिवसेनेच्या ४१ बंडखोरांसह अनेकांनी अपक्ष अर्ज भरलेले. त्यांचीही जादू मतदारांवर चाललेली नाही. अवघे ५ अपक्ष उमेदवार निवडून आले असून १४३ उमेदवारांना डिपॉझिट गमवावे लागले आहे.
च्प्रभाग क्रमांक ७, १७, ७७ व ७८ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांचेही डिपॉझिट जप्त झालेले आहे. या प्रभागांमध्ये अनुक्रमे विजय चौगुले, हेमांगी सोनावणे, वैजयंती भगत व रूपाली भगत विजयी झालेले आहेत. सर्व प्रभागांमध्ये ७ अंकाचे साम्य दिसून आलेले आहे.