Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापालिकेच्या विभागनिहाय स्वच्छता मोहीमेला उद्यापासून सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 10:04 IST

रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धारावी, डी विभागात सुरुवात.

मुंबई : स्वच्छ मुंबई मोहीम आणखी नेटाने राबवण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेने आणखी एक पाऊल  पुढे टाकले आहे. रविवारपासून विभागनिहाय संपूर्ण स्वच्छता मोहिमेला सुरुवात होणार आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ३ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता धारावीतून या मोहिमेला प्रारंभ होईल. याच दिवशी ‘डी’ विभागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवली जाईल. या विशेष मोहिमेंतर्गत रस्ते - पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई,  सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्यान- क्रीडांगणांची निगा, फेरीवाला विरहीत क्षेत्र, राडारोडामुक्त परिसर इत्यादी स्वरूपाची  कार्यवाही केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेस व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी मुंबईकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

‘डीप क्लिनिंग’ मोहीम :

‘डीप क्लिनिंग’ मोहीम राबविण्याचा संकल्प आम्ही   केला आहे, असे पालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.  पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या मोहिमेची रूपरेषा ठरविण्यात आली. डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ या दोन महिन्यातील प्रत्येक शनिवारी परिमंडळातील एक प्रभाग निवडून व्यापक स्तरावर व सूक्ष्म पातळीवर संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) केली जाणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू राहील.

टॅग्स :मुंबईनगर पालिका