मारेकरी वडिलांना जामिनास नकार
By Admin | Updated: November 9, 2016 04:14 IST2016-11-09T04:14:48+5:302016-11-09T04:14:48+5:30
मुलीचे वडील बंदूक हातात घेऊन मुलापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवत नाहीत, असे निरीक्षण नोंदवत, उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्या प्रियकराची हत्या

मारेकरी वडिलांना जामिनास नकार
मुंबई : मुलीचे वडील बंदूक हातात घेऊन मुलापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवत नाहीत, असे निरीक्षण नोंदवत, उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्या प्रियकराची हत्या करणाऱ्या वडिलांची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला.
बसवराज चौगुले यांच्यावर आॅगस्ट २०१५ मध्ये अल्पवयीन मुलाची हत्या व शस्त्र बाळगल्याप्रकरणी जोधवीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. जामिनावर सुटका करण्यात यावी, यासाठी चौगुलेनी उच्च न्यायालयात अर्ज केला. या अर्जावरील सुनावणी न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होता.
अभिजित पवार (बदलेले नाव) मॅकॅनिकल इंजिनीयरिंगचा अभ्यास करत होता. नेहा चौगुले (बदलेले नाव) व अभिजितचे एकमेकांवर प्रेम असल्याने, ३० जुलै २०१५ रोजी ते पळून गेले. त्यानंतर, चौगुलेने पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. मुलाच्या पालकांनी दोघांना पुण्यातून सोलापूरमध्ये आणले. मुलाच्या व मुलीच्या पालकांनी दोघेही सज्ञान झाल्यावर त्यांचा विवाह करण्याचा निर्णय घेतला. १५ आॅगस्ट २०१५ रोजी चौगुलेला मुलगी घरात न दिसल्याने, त्याला मुलगी पुन्हा एकदा पळाली असावी, असा संशय आला. त्यामुळे त्याने थेट मुलाचे घर गाठले. दोन्ही कुटुंबांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर, चौगुलेने अभिजितवर गोळ्या झाडल्या. अभिजितचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला. चौगुलेच्या वकिलांनी चौगुलेने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचा युक्तिवाद केला. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य करण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)